पुणे : पुढारी वृत्तसेवा : रेल्वेच्या सुनील जैन यांनी पुणे येथे विमा लोकपाल-महाराष्ट्र म्हणून पदभार स्वीकारला आहे. विमा लोकपाल–पुणे कार्यालयाचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य (मुंबई मेट्रो वगळता) आहे. विमा लोकपाल, लोकपाल नियम 2017 द्वारे शासित आहे आणि यांची पुण्यासह देशात 17 वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालये आहेत. जैन 1986 च्या बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवेचे अधिकारी आहेत. या आधी ते केंद्रीय संरक्षण मंत्रालय आणि ऊर्जा मंत्रालयात केंद्रीय दक्षता आयोगाच्या वतीने इंडिपेंडेंट एक्सटर्नल मॉनिटर म्हणून काम करत होते.
जैन यांना सार्वजनिक सेवेत विविध पदांवर काम करण्याचा 35 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी केंद्रीय दक्षता आयोगाच्या वतीने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड-मुंबई येथे मुख्य दक्षता अधिकारी म्हणून काम केले आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वे मुख्यालय-मुंबई येथे त्यांनी मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक आणि मुख्य प्रवक्ता अशी महत्त्वाची पदे देखील भूषवली आहेत. जैन यांनी इंटरनॅशनल अँटी करप्शन अकादमी – व्हिएन्ना ऑस्ट्रिया, इंडियन स्कूल ऑफ बिझनेस – हैदराबाद, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी – हैदराबाद यांसारख्या अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रशिक्षण घेतले आहे