पुणे; पुढारी वृत्तसेवा : विकसित देशांच्या जडणघडणीत त्यांच्या मातृभाषेचा मोठा वाटा आहे. नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आला आहे. इंग्रजीचा तिरस्कार करून चालणार नाही, पण मातृभाषेचा पुरस्कार केला पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. क्रीडामंत्री गिरीश महाजन, मुकुंद माधव ट्रस्टचे पुरुषोत्तम लोहिया, मुख्याध्यापिका माधुरी बर्वे, प्रभारी कार्यवाह आशिष पुराणिक, विश्वस्त जगदीश कदम, रवी आचार्य आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर भर दिला आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण मराठीत शक्य आहे. मराठी ज्ञानभाषा करण्यासाठीची व्यवस्था उभी करण्यात येत आहे. त्यामुळे इंग्रजी येत नाही म्हणून मागे पडणार्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. एक काळ छडीचा होता, आता छडी घेतली तर शिक्षकांना तुरुंगात जावे लागते.
पूर्वीची पद्धत जरा कठोर होती. आता मुलांना शिकायला आवडेल असे वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे आहे. नव्या शैक्षणिक धोरणात पूर्वप्राथमिक-प्राथमिक शिक्षणावर भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्याचा हा काळ असतो. अनुभवापेक्षा मोठा शिक्षक नाही. व्यक्तिमत्त्व फुलविण्याचा पायंडा नव्या शैक्षणिक धोरणात आहे. उद्याच्या पिढीला, देशाला या धोरणाचा फायदा होईल. विकसित देशांच्या घडण्यात त्यांच्या मातृभाषेचा वाटा मोठा आहे.
कोणत्याही संस्थेचे मूल्यमापन इमारती किती सुंदर, अद्ययावत सुविधा आहेत यावर करता येत नाहीत. तर प्रत्येक व्यक्तीला कवेत घ्यायला ही संस्था तयार आहे का, विद्यार्थ्यांना हवेहवेसे वातावरण शिक्षक करतात का हे जास्त महत्त्वाचे आहे. पराजयाचा इतिहास बाजूला ठेवून विजयाचा इतिहास शिकला पाहिजे. उज्ज्वल संस्कृतीचा पुरस्कार, घटनेने दिलेली मूल्ये जपत पुढे जायचे आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
परिचय ऐकताना घाबरलो होतो…
परिचय करून देताना मी घाबरलोच होतो. कारण गुगलवरून परिचय काढतात. त्यात ते काय घेतील याचा भरवसा नसतो. त्यामुळे अनेकदा आपलाच परिचय आपल्याला नव्याने होतो, अशी टिप्पणी फडणवीस यांनी केली.