पुणे : राज्याला हुडहुडी भरणार; दोन दिवसांत कडाका वाढणार | पुढारी

पुणे : राज्याला हुडहुडी भरणार; दोन दिवसांत कडाका वाढणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत राज्यात कडाक्याची थंडी सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उत्तर भारतात गेल्या दोन दिवसांपासून सर्व राज्यांत दाट धुके तसेच थंडीची लाट आली आहे. त्यामुळे राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, उत्तराखंड, हरियाणा भागांत तीव्र थंडी आणि दाट धुके पसरले आहे.

येत्या 7 ते 9 जानेवारीदरम्यान हिमालयीन भागात पश्चिमी चक्रवाताची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे उत्तर भारतातील सर्वच राज्यांत थंडीच्या लाटेबरोबरच दाट धुक्यामध्ये वाढ होणार आहे. या स्थितीमुळे उत्तर भारतातून राज्याकडे तीव्र थंड वारे वाहणार आहेत. त्यामुळे राज्यात येत्या 24 तासांत थंडीचा कडाका वाढणार आहे. सध्या राज्यात किमान आणि कमाल तापमानात सरासरीपेक्षा तीन ते चार अंशांनी वाढ आहे. मात्र, उत्तर भारताकडून राज्याकडे थंड वारे वाहू लागल्यानंतर अचानक वातावरणात बदल होऊन थंडी वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Back to top button