पुणे : भिडेवाड्यासाठी प्रभावी भूमिका मांडा; पालकमंत्री पाटील यांची महाधिवक्त्यांना विनंती | पुढारी

पुणे : भिडेवाड्यासाठी प्रभावी भूमिका मांडा; पालकमंत्री पाटील यांची महाधिवक्त्यांना विनंती

पुणे : पुण्यातील भिडेवाड्याचे महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे या वाड्याचा राष्ट्रीय स्मारकाच्या रूपात विकास होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मात्र, या स्मारकाचा वाद उच्च न्यायालयात सुरू असल्याने त्या ठिकाणी शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी विनंती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांच्याकडे केली. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील भिडेवाड्यासंदर्भातील न्यायालयीन प्रकरणाबाबत राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांची मुंबईत भेट घेऊन चर्चा केली.

पुण्यातील भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. ही वास्तू प्रेरणास्थान आहे. येणार्‍या पिढीने इथून सामाजिक कार्याची आणि शिक्षणाची प्रेरणा घ्यावी, यासाठी भिडेवाड्याचा राष्ट्रीय स्मारक म्हणून विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र, सदर जागेचे दोन मालक न्यायालयात गेले असल्याने सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने व्हावी, त्यासाठी राज्याच्या महाधिवक्त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्मारकासाठीची शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी विनंती पाटील यांनी केली.

Back to top button