वडगावातील नाट्यगृहाचे काम निधीअभावी ठप्प | पुढारी

वडगावातील नाट्यगृहाचे काम निधीअभावी ठप्प

मिलिंद पानसरे

धायरी : सिंहगड रोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथील गोयलगंगा सोसायटीसमोर डी. पी. रस्त्यालगत नाट्यगृह व कलामंदिराचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे सध्या हे काम बंद आहे. यामुळे सिंहगड रोड परिसरातील नाट्य, संगीत व कलाप्रेमी व नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

या इमारतीत आतापर्यंत दोन मजली पार्किंग, आसन व्यवस्था, रंगमंच, मेकअप रूम, पडदा टाकण्याचा बीम, अंडर ग्राउंड पाण्याच्या टाक्या, इत्यादींचे काम पूर्ण झाले आहे. आसन व्यवस्थेवरील छताचे केवळ फॅब्रिकेशनचे काम झाले आहे. परंतु, वरील दोन मजल्याचे काम रखडले आहे. उर्वरित कला दालन, छतावरच्या टाक्या, अंतर्गत बांधकाम, प्लॅस्टर, प्लंबिंग, साईड डेव्हलपमेंट, अंतर्गत इंटेरिअर, विद्युतीकरण, रंगकाम, नक्षीकाम आदींसह अनेक कामे होणे अद्यापही बाकी आहे. आतापर्यंत अर्धे काम पूर्ण झाले असून, उरलेले काम पूर्ण करण्यााठी पालिकेला अजून किती दिवस लागणार, असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.

या प्रकल्पासाठी आतापर्यंत सोळा कोटी रुपये खर्च करण्यात असल्याची माहिती महापालिकेच्या भवन रचना विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. दरम्यान, या कामासाठी चालू आर्थिक वर्षात (2022-23 ) सव्वातीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीसाठी महापालिकेच्या वित्तीय समितीने मंजुरी दिली असून, निविदा प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे. ही निविदा मान्यतेसाठी आयुक्तांकडे पाठविण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसांत या निविदेस मान्यता मिळण्याची शक्यता आहे. निविदेच्या मान्यतेनंतर वर्कऑर्डर काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या नाट्यगृहाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

आंदोलनाचा इशारा
वडगाव बुद्रुक येथील नाट्यगृहाचे काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासनाने या कामासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून रखडलेले काम पूर्ण करावे; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते बाप्पूसाहेब पोकळे यांनी दिली.

दृष्टिक्षेपात नाट्यगृह…
नाट्यगृहासाठी येणार 35 कोटी रुपयांचा खर्च
साडेसातशे प्रेक्षकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था
भव्य कलादालन आणि आर्ट गॅलरीची सोय
भारतीय शास्त्रीय संगीत महाविद्यालय येथे सुरू होणार
कलाकरांसाठी सुसज्ज ग्रीन रूम

साहित्य व कला संस्कृती जपण्यासाठी या नाट्यगृहाचे काम लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. साहित्यिक व कलाकारांबरोबर रसिक श्रोत्यांचा आनंदही या नाट्यगृहाचे काम झाल्यानंतर द्विगुणित होणार आहे. या प्रकल्पासाठी कलम  72 ब अन्वये मान्यता देण्यात आल्यामुळे प्रशासनाने निधी उपलब्ध करून हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याची गरज आहे.

                                                           श्रीकांत जगताप, माजी नगरसेवक

या नाट्यगृहासाठी 2022-23च्या अंदाजपत्रकात 4 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 75 लाखांच्या निधीतून एका 18 मीटर उंचीवरील स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 3.25 कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, ती मान्येतेसाठी पाठविण्यात आली आहे. याबाबतची कार्यवाही येत्या आठ दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

                                        रामदास कडू, उपअभियंता, भवन रचना, महापालिका

Back to top button