

पुणे, पुढारी वृत्तसेवा: भाई न म्हटल्याच्या कारणातून येरवडा भागात एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी सराइतासह तिघांना अटक करण्यात आली.
संतोष पंडीत साळवे (वय 36, रा. यशवंतनगर, येरवडा ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रफुल्ल उर्फ कान्या सोनवणे (वय 30 रा. नवी खडकी), संकेत मोरे उर्फ मेड्या, सोनू मोरे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा साथीदार महेश सुरेश पवार पसार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष साळवे रात्री सव्वा आठच्या सुमारास व्यायाम शाळेतून घरी निघाले होते. त्यावेळी ओळखीतील प्रफुल्ल त्यांना भेटला. संतोषने काय पप्या काय चालले आहे, असे विचारले. 'तुला माज आला आहे का, तुला भाई बोलता येत नाही का', असे आरोपी संकेत मोरे त्यांना म्हणाला. त्यानंतर आरोपी संकेतने संतोषच्या डोक्यात गज मारत मोबाइल फोडला. त्या वेळी रहिवाशांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.आरोपींनी परिसरात दहशत माजविली. पोलीस उपनिरीक्षक शेलार अधिक तपास करत आहेत.