मैत्रिणीबरोबर पार्किंगमध्ये बोलत थांबला होता, हॉटेल मालकाने हटकले; मग काय...रागाच्या भरात दुसऱ्या दिवशी हॉटेलच फोडले | पुढारी

मैत्रिणीबरोबर पार्किंगमध्ये बोलत थांबला होता, हॉटेल मालकाने हटकले; मग काय...रागाच्या भरात दुसऱ्या दिवशी हॉटेलच फोडले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: गुन्हेगारांना पोलिसांचा धाक वाटतो की नाही, असे चित्र पुण्यात आता दिसू लागले आहे. शस्त्रधारी टोळके हातात कोयते नाचवत वाटेल तिथे दहशत निर्माण करू पाहत आहेत. भवानीपेठ परिसरातील हॉटेल निशा रेस्टॉरंटची गुरुवारी (दि.5) दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास टोळक्याने कोयते, हॉकी स्टीक व लोखंडी रॉडने तोडफोड करून दहशत निर्माण केली. त्यानंतर हॉटेल मालकाला शिवीगाळ केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

याप्रकरणी, लष्कर पोलिस ठाण्यात मोनिष म्हेत्रे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा अनोळखी व्यक्तींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भवानीपेठ येथे हॉटेल निशा नावाचे रेस्टॉरंट आहे. गुरूवारी दुपारी ते आणि त्यांचे कामगार हॉटेलमध्ये काम करत होते. हॉटेलमध्ये गर्दी असल्यामुळे फिर्यादी समोरील पार्किंगमध्ये बसले होते. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास दुचाकीवरून पाच ते सहा तरुण तोंडाला रुमाल बांधून तिथे आले. त्यांच्या हातात कोयता, हॉकी स्टिक आणि लोखंडी रॉड होते. फिर्यादी त्यांना काऊंटरवर दिसले नाहीत. त्यामुळे ते परत फिर्यादी थांबलेल्या ठिकाणी आले. त्यांनी त्यांच्याकडे पाहून शिवीगाळ केली. त्यानंतर दोघे तीघे हॉटेलमध्ये गेले. त्यांनी आतमध्ये तोडफोड केली. तसेच इतरांनी हॉटेलबाहेर ठेवलेल्या खुर्च्यांची तोडफोड करून परत फिर्यादींना पाहून शिवीगाळ केली. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी लष्कर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास लष्कर पोलिस करत आहेत.

म्हणून केली तोडफोड…

आरोपीपैकी एकजण त्याच्या मैत्रिणीबरोबर निशा हॉटेलसमोरील पार्किंगमध्ये बोलत थांबला होता. त्यावेळी हॉटेल मालकाने त्याला हटकले होते. त्याचा राग आल्याने त्याने दुसर्‍या दिवशी आपल्या इतर साथीदारांना सोबत घेऊन हॉटेलमधील खुर्च्यांची तोडफोड केली. दरम्यान गुन्हा दाखल होताच चौघांना लष्कर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ते सर्वजण अल्पवयीन आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.

Back to top button