देवाच्या आळंदीत धक्कादायक प्रकार! येशूचे रक्त असल्याचे सांगत द्राक्ष रस पाजून धर्मांतर करण्याचा प्रयत्न | पुढारी

देवाच्या आळंदीत धक्कादायक प्रकार! येशूचे रक्त असल्याचे सांगत द्राक्ष रस पाजून धर्मांतर करण्याचा प्रयत्न

आळंदी, पुढारी वृत्तसेवा: संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या देवाच्या आळंदीत येशूचे रक्त असल्याचे सांगून द्राक्षाचा रस पाजत धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे आळंदी पोलिसांनी सांगितले.

या घटनेचा एक व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला असून आळंदीच्या साठेनगर परिसरामध्ये हा प्रकार घडल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यासंदर्भात रीतसर तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उद्धव नागनाथ कांबळे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानंतर सुधाकर बाबुराव सूर्यवंशी याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या महिलेच्या हातामध्ये एक ताट असून त्यात लाल रंगाचं पाणी असलेले ग्लासही दिसत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लाल पाणी म्हणजे द्राक्षाचं पाणी आहे. ते येशूचं रक्त म्हणून दिलं जात असल्याचं समोर आलं आहे. आरोपी सुधाकर बाबुराव सूर्यवंशी हा त्याच्या दोन साथीदारांसह काही स्थानिकांना “ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनेने तुमचे आजार बरे करतो. तुम्ही येशूची पूजा करा, तुमच्या आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या दूर होतील. तसेच हिंदू धर्म सोडून तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारा” असा आग्रह करत असल्याचं पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.

Back to top button