पिंपरी : जनआरोग्य योजनेचे 8 हजार लाभार्थी | पुढारी

पिंपरी : जनआरोग्य योजनेचे 8 हजार लाभार्थी

तळेगाव दाभाडे : पुढारी वृत्तसेवा :  आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या पात्र लाभार्थी यांची यादी तळेगाव दाभाडे नगरपरिषद वेबसाईटवर उपलब्ध झाली असल्याची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली. या योजनेअंतर्गत तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील सुमारे 1600 ते 1700 कुटुंबातील जवळजवळ 7 हजार 801 लाभार्थी यांची नावे सामाविष्ट आहेत.
केंद्र सरकारमार्फत सामाजिक आर्थिक आणि जातीय जनगणना 2011 मधील माहितीवर आधारित गरीब व मागास ग्रामीण कुटुंब व निर्देशित व्यावसायिक शहरी कुटुंबाकरिता आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या पात्र लाभार्थींची यादी प्रकाशित
केलेली आहे.

तळेगाव दाभाडे नगर परिषद क्षेत्रातील आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना आरोग्य विमा योजनेचा लाभ सहजरीत्या उपलब्ध व्हावा, यादृष्टीने नगरपरिषदेने पात्र लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड वाटप नियोजन करण्याचे ठरविले आहे. यासाठी नगरपरिषदेने संपर्क अधिकारी म्हणून विभा वाणी यांना नियुक्त केलेले आहे. यादी तळेगाव दाभाडे नगर परिषदच्या alegaondabhademc.org.in या वेबसाईटवर  उपलब्ध आहे. पात्र लाभार्थी यांनी योजनेअंतर्गतचे आपले डिजिटल कार्ड उपलब्ध करून घ्यावे व आपल्या कुटुंब सदस्यांना योग्य व मोफत उपचाराचे फायदे मिळवून स्वतःचे आरोग्य जपावे, असे आवाहन तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे.

उपचारात मिळणार सवलत

ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत असून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत 2018 मध्ये सुरू केली गेली आहे. या योजनेच्या लाभार्थींना उपचारासाठी दरवर्षी 5 लाख रुपये इतके रकमेचे उपचार शासनामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेचा कार्डधारक देशभरातील कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी ररुग्णालयामधून जवळ जवळ 1200 रोगांसाठीचे उपचार कॅशलेस पद्धतीने घेऊ शकतो.

Back to top button