शिवण्यात रातोरात ड्रेनेज लाईन; पुरासह आरोग्याचा प्रश्न

शिवण्यात रातोरात ड्रेनेज लाईन; पुरासह आरोग्याचा प्रश्न

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : दाट लोकसंख्या असलेल्या शिवणे परिसरात महापालिकेच्या वतीने चुकीची ड्रेनेज लाईन टाकण्यात आल्याने पावसाळ्यात पुरासह आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. तर, पुढील तीस वर्षांचे नियोजन करून ही वाहिनी टाकण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. दरम्यान, ही ड्रेनेज लाईन रातोरात टाकण्यात आली आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे यांनी याबाबत महापालिका आयुक्त व वारजे क्षेत्रीय कार्यालयाला निवेदन दिले आहे. शिवणे येथील इंगळे ओढ्याच्या पात्रातून मुठा नदीपर्यंत जेमतेम एक फूट रुंदीची ड्रेनेज लाईन टाकण्यात आली आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर अनिता इंगळे यांनी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम इंगळे, कुणाल गराडे व स्थानिक रहिवाशांसह कामाच्या ठिकाणी धाव घेतली.

त्यानंतर संबंधित अधिकार्‍यांकडे फोनवर याबाबत तक्रार केली. मात्र, रातोरात ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम पूर्ण करून मशिनरी, मजुरासह ठेकेदार गायब झाला. महापालिकेच्या वतीने समाविष्ट गावात ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी सल्लागार नेमले होते. त्यांनी पुढील तीस वर्षांच्या ड्रेनेजचे नियोजन केले आहे. त्यानुसार शिवणे येथील ओढ्यात ड्रेनेज लाईन टाकण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

पाणी शिरण्याचा धोका
परिसरात दोनशेहून अधिक इमारती आहेत. जवळपास आठ ते दहा हजारांवर लोकसंख्या या भागात आहे. त्यामुळे या ठिकाणी दोन ते तीन फूट रुंदीच्या ड्रेनेज लाईन टाकणे गरजेचे आहे. पावसाळ्यात ओढ्यातून वाहणार्‍या पाण्याला अडथळे होऊन पुराचा धोका निर्माण होऊन या भागातील सोसायटी, लोकवस्त्यांत पाणी शिरण्याचा धोका असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे यांनी सांगीतले.

महापालिकेने सध्याची लोकसंख्या विचारात न घेता व समक्ष पाहणी न करता ही ड्रेनेज लाईन टाकण्यात आली आहे. भविष्यात त्याचा फटका स्थानिक रहिवाशांना बसणार आहे.

                                                               -कुणाल गराडे, रहिवासी

ड्रेनेज टाकण्याचे काम मलनिस्सारण विभागाने केले आहे. त्याबाबत त्यांच्याकडे नागरिकांची तक्रार देण्यात आली आहे.

                                                              -ऋ तुराज दीक्षित,
                                                 शाखा अभियंता, वारजे क्षेत्रीय कार्यालय

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news