पुणे : संगमवाडी रेल्वे क्रॉसिंगवर स्टील गर्डर | पुढारी

पुणे : संगमवाडी रेल्वे क्रॉसिंगवर स्टील गर्डर

पुणे; वृत्तसेवा : पुणे मेट्रोच्या रामवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक या मार्गावरील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. या मार्गिकेवरील संगमवाडी रेल्वे क्रॉसिंग येथे स्टील गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. हे काम महत्त्वपूर्ण आणि आव्हानात्मक होते.
मेट्रो प्रशासनाने सोमवारी (दि. 2) आणि मंगळवारी (दि. 3) असे दोन दिवस हे काम केले. या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून दोन्ही दिवस दुपारी या मार्गावरील रेल्वे थांबवून ब्लॉक घेण्यात आला होता. या कालावधीतच मेट्रोच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी हे काम पूर्ण केले.

या मार्गिकेवर बसविलेला स्टील गर्डर हा दोन भागांमध्ये बसविण्यात आला. या स्टील गर्डरची एकूण लांबी 45 मीटर असून, त्याच्या एका भागाचे अंदाजे वजन 115 मेट्रिक टन (दोन्ही भागांचे एकूण अंदाजे वजन 230 मेट्रिक टन) आहे. हा गर्डर बसविण्यासाठी क्रेनचा उपयोग करण्यात आला. या क्रेनची क्षमता 400 मेट्रिक टन इतकी होती. पुणे मेट्रोमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या क्रेनचा वापर करण्यात आला आहे. हे दोन्ही स्टील गर्डर मार्गावर लावण्यात आल्यामुळे वनाज स्थानक ते रामवाडी स्थानक या मार्गिकेवरील महत्त्वाचे काम झाले असून, येत्या काही दिवसांत या मार्गिकेवर ट्रायल रन घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रामवाडी स्थानक या मार्गाचे व्हायाडक्तचे काम 90% झाले आहे. येत्या काही महिन्यांत व्हायाडक्तचे काम पूर्ण होईल. या मार्गावरील मेट्रो स्थानकांचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गामुळे मेट्रो नेटवर्क पुणे रेल्वे स्थानक, वाडिया कॉलेज चौक, बंडगार्डन, कल्याणीनगर आणि रामवाडी हे उर्वरित मेट्रोला जोडले जातील.

                                                                               डॉ. ब्रिजेश दीक्षित,
                                                                      व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

Back to top button