पुणे : अशोकमामांचं काम हे खर्‍या अर्थाने ‘पर्व’च : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गौरवोद्गार | पुढारी

पुणे : अशोकमामांचं काम हे खर्‍या अर्थाने ‘पर्व’च : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गौरवोद्गार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘आज व्यस्त राजकीय जीवनात रसिक म्हणून पूर्ण नाटक पाहणं शक्य नसलं, तरी मुंबईचा जन्म आणि लहानपण मुंबईतच गेल्यामुळे मी अनेकदा ‘शिवाजी मंदिर’मध्ये अशोकमामांची नाटके समोर बसून पाहिली आहेत. अशोक सराफ यांची क्रेझ ही अजूनही प्रेक्षकांमध्ये कायम असून, अशोकमामांचं काम हे खर्‍या अर्थाने ‘पर्व’च आहे,’ असे गौरवोद्गार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यावर चित्रित लोकप्रिय गाणी, चित्रपट, नाटक, मुलाखत यांची मेजवानी असणार्‍या ‘अशोक पर्व’ या महोत्सवाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, रावेतकर समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अमोल रावेतकर आणि अभिव्यक्ती संस्थेचे राजेश दामले आदी उपस्थित होते.

अशोक सराफ यांनी नुकतीच आपल्या वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली, याशिवाय मराठी चित्रपटसृष्टीत त्यांच्या कारकिर्दीला यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने अशोक सराफ यांचा जीवनप्रवास व त्यांचा अभिनय क्षेत्रातील सुवर्ण महोत्सवी प्रवास ‘अशोक पर्व’ या विशेष महोत्सवातून उलगडण्यात येत आहे.

पाटील म्हणाले, ‘आजही वयाची 75 वर्षे पूर्ण केली, तरी अशोकमामांच्या चेहर्‍यावरील आणि अभिनयातील ताजेपणा टिकून आहे. ते मितभाषी असले, तरी नाटकावेळी संवादावर त्यांची असलेली पकड प्रेक्षकांना खिळवून ठेवते.’ यानंतर अशोक सराफ व अभिनेत्री निर्मिती सावंत यांची भूमिका असलेला ‘व्हॅक्यूम क्लिनर’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी अभिनेते प्रशांत दामले हे अशोक सराफ यांची प्रकट मुलाखत घेतील. हा कार्यक्रम कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे दुपारी 4 वाजता होणार आहे. कार्यक्रमानंतर रसिकांच्या वतीने व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते अशोक सराफ यांचा विशेष सन्मान करण्यात येईल.

Back to top button