पुणे : सुशोभीकरणाच्या कामाची जबाबदारी अधिकाऱ्यांवर; जी-20 परिषदेची कामे गतीने करण्याची सूचना | पुढारी

पुणे : सुशोभीकरणाच्या कामाची जबाबदारी अधिकाऱ्यांवर; जी-20 परिषदेची कामे गतीने करण्याची सूचना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जी- 20 परिषदेच्या निमित्ताने करावयाची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिल्या आहेत. दरम्यान, सुशोभीकरणाची कामे वेळेत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी दहा ते बारा अधिकार्‍यांवर सोपविली आहे.
शहरात जी-20 परिषदेच्या बैठका होणार असल्याने जगातील 35 हून अधिक देशांचे अधिकारी येणार आहेत. या निमित्ताने महापालिकेने शहरातील विविध रस्त्यांचे डांबरीकरण, सुशोभीकरण आदी कामे हाती घेतली आहेत. या परिषदेच्या कार्यक्रमस्थळाकडे जाणारे रस्ते, चौक, विमानतळ ते निवासव्यवस्था असणार्‍या भागातील रस्त्यांची कामे केली जात आहेत.

ही कामे पुढील आठवड्यात पूर्ण करणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांची बैठक घेतली. तसेच दहा ते बारा अधिकार्‍यांवर जबाबदारी सोपविली आहे. दरम्यान, आयुक्तांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणीही पाहणी केली होती. या अनुषगांने त्यांनी हे आदेश दिले आहेत. रस्त्यांचे डांबरीकरण, पदपथ व्यवस्थित करणे, रस्त्यांवर पडलेला राडारोडा उचलणे, प्रकाश व्यवस्था, भिंती रंगविणे, रस्ता दुभाजकांवर सुशोभीत झाडे लावणे, प्रकाश व्यवस्थेचे खांब रंगविणे, कामांचा राडारोडा उचलणे आदी स्वरुपाच्या कामांचा यात समावेश आहे. त्यानुसार पथ विभाग, विद्युत विभाग, घन कचरा व्यवस्थापन विभाग आदी विभागांच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांना आदेश दिले आहेत.

सर्व खात्यांमध्ये समन्वय निर्माण करणे आणि कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकार्‍यांवर जबाबदारी सोपविली आहे. राडारोडा उचलणे, बॅरिकेड्सवर स्टीकर्स बसविणे, मेट्रो मार्गाच्या खालील दुभाजकावर सुशोभीत झाडे लावणे, त्याची रंगरंगोटी करणे, जी -20 परिषदेचे ब्रँडिंग करणे आदी सूचना पुणे मेट्रो आणि पीएमआरडीए मेट्रो प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. जर या दोन्ही प्रशासनाने कामे वेळेत पूर्ण केली नाही, तर महापालिका ही कामे स्वत: करून त्यांच्याकडून शुल्क वसूल करेल, असा इशारा देण्यात आला आहे.

चर्चासत्र, सायकल रॅलीही निघणार
चर्चासत्र, राज्य आणि शेजारील राज्यातील महापालिकांच्या आयुक्तांचा परिसंवाद, संकल्पनांची देवाण- घेवाण, जी -20 परिषद म्हणजे नेमकी काय? ही माहिती नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी चर्चासत्र, सायकल रॅली, वॉकेथॉन आदी आयोजित केले जाणार आहे.

Back to top button