पुणे: लोहगडावर कलम 144 लागू, उरुसाला परवानगी नाकारली | पुढारी

पुणे: लोहगडावर कलम 144 लागू, उरुसाला परवानगी नाकारली

पुणे: पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर होणाऱ्या उरुसाला पुरातत्व विभागाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबत अनेक संघटनांनी निवेदन दिले होते. त्यानंतर आता लोहगडावर उरुस साजरा करण्यास परवानगी नाकारली आहे. किल्ल्यावर तीन दिवसांसाठी कलम 144 लागू करण्यात आलं आहे. किल्ल्यावरील दर्ग्याच्या उरुसला नाकारलेली परवानगी आणि ही दर्गा अनधिकृत असल्याने येथे उरुस भरु देणार नाही, असं सांगत बजरंग दलासह इतर संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाने कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

शुक्रवार 6 जानेवारी रोजी लोहगडावर हाजी हजरत उमरशावली बाबाचा उरुस भरणार होता. या उरुसासाठी आयोजकांनी पुरातत्व विभागाकडे परवानगी मागितली होती. मात्र, ती नाकारण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या संघटनांना आणि नागरिकांना सूचना दिल्या आहेत.

उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सूचना

1) कोणीतीही व्यक्ती इन्स्टाग्राम, व्हॉटसअॅप, ट्विटर, फेसबुक आणि इतर समाजमाध्यमाद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणार नाही किंवा फॉरवर्ड करणार नाही, असे केल्यास त्याबाबतची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती तसेच ग्रुप अॅडमिनची राहील.

2) लोहगड आणि घेरेवाडी हद्दीमधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागाच्या लेखी परवानगी शिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध राहील.

3) परिसरामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी जमा होऊ नये.

4) समाज भावना भडकवतील अशा घोषणा/भाषण करु नये.

5) संबंधित परिसरामध्ये मोर्चा/आंदोलन करण्यात येऊ नये.

6) प्रतिबंधात्मक कालावधी दरम्यान धार्मिक विधींसाठी पशुपक्षांचा बळी दिला जाऊ नये.

7) संबंधित परिसरामधील ऐतिहासिक आणि सार्वजनिक वस्तुंचे नुकसान करण्यात येऊ नये.

 

Back to top button