बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : सावजाची शिकार करण्यासाठी बिबट्या वडाच्या झाडावर चढला खरा, परंतु झाडावर असलेल्या तारांच्या फासात पाय अडकल्याने डरकाळी फोडून सुटण्याचा प्रयत्न करत असल्याचे गुळुंचेवाडी येथे बुधवारी (दि. 4) पहाटे चारच्या सुमारास नागरिकांच्या निदर्शनास आले. ही माहिती ग्रामस्थांनी तत्काळ वन विभागाला कळवली. वन अधिकारी व माणिकडोह व्याघ्र संरक्षण टीमने घटनास्थळी भेट देत बिबट्याला गनमधून भुलीचे इंजेक्शन दिले. तब्बल तासाभरात बिबट्याला ताब्यात घेतल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. तोपर्यंत नगर-कल्याण महामार्गालगत या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
गुळूंचेवाडी येथील गोरक्ष भांबेरे यांच्या घरासमोर असलेल्या वडाच्या झाडावर अडकवलेल्या तारांच्या बंडलात बिबट्याचा डावा पाय अडकल्याने त्याला बाहेर पडता येईना. त्यामुळे त्याने डरकाळी फोडण्यास सुरुवात केली. बिबट्याच्या डरकाळीने झोपेतून जागे झालेल्या भांबेरे कुटुंबाने बॅटरीच्या साह्याने डरकाळी कोठून येत आहेत याचा शोध घेतला. त्यावेळी बिबट्या झाडावर तारांच्या फासात अडकल्याचे निदर्शनास आले. मात्र, बिबट्याच्या डरकाळीने संपूर्ण वस्ती जागी झाली आणि घटनास्थळी धाव घेतली. त्यातील काही ग्रामस्थांनी बिबट्या पाहिल्यानंतर वन विभागाला माहिती दिली.
तत्काळ माणिकडोह बिबट्या निवारा प्रकल्पाचे रेस्क्यू पथक तसेच वनविभागाचा ताफा या भागात पोहोचला. बिबट्याला बघण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या पथकाला अडचणी येत होत्या. वनकर्मचार्यांनी बघ्यांची गर्दी पांगवत पिंजरा असलेली गाडी बिबट्याच्या झाडाजवळ नेऊन उभी केली. रेस्क्यू पथकातील गनधारी व्यक्ती त्या गाडीच्या टपावर चढून झाडावरील बिबट्याला गनद्वारे इंजेक्शनमधून भूल दिली. तसेच जाळी व अन्य सामग्रीही तयार ठेवली.
बिबट्याला भूल चढल्याचे निदर्शनास येताच रेस्क्यू पथकाने झाडावर चढून बिबट्याला ताब्यात घेतले. या पथकाने बिबट्यास स्ट्रेचरवर घेऊन पिंजर्यात जेरबंद केले. नंतर बिबट्याला तेथून माणिकडोह बिबट निवारा प्रकल्पात हलवण्यात आले असल्याचे ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी सांगितले.