केडगाव : अशिक्षित महिलांचा ग्रुप करतोय ठेकेदारी | पुढारी

केडगाव : अशिक्षित महिलांचा ग्रुप करतोय ठेकेदारी

केडगाव; पुढारी वृत्तसेवा : कष्टला पर्याय नाही आणि ते पुरुषानेच केले पाहिजे हे कायद्यात नाही. आपलेही कर्तृत्व मोठे असते, हे पाटस (ता. दौंड) येथील महिलांनी दाखवून दिले आहे. शांताबाई चव्हाण या अशिक्षित महिला ठेकेदाराची कर्तबगारी पाहिल्यावर खर्‍या अर्थाने महिला पुरुषांच्या बरोबरीने कष्टाची कामे करू शकतात, याचा दाखला मिळतो आहे. शांताबाई चव्हाण या महिला समूहाच्या प्रमुख असून, जवळपास आठ ते दहा महिलांचा ग्रुप करून सिमेंटची कामे करतात. त्यांच्या ग्रुपमध्ये पुरुषाला स्थान नाही, ही बाब विशेष आहे.

सिमेंट कामामध्ये काँक्रिटीकरण, बिम भरणे, अशा स्वरूपाची अतिकष्टाची महत्त्वाची कामे या महिलांचा ग्रुप करतो आहे. गेल्या वीस वर्षांपासून त्यांचे हे नित्याचे काम अथकपणे सुरू आहे. सिमेंट काँक्रीटच्या कामांमध्ये आत्तापर्यंत पुरुषांचेच वर्चस्व होते आणि ठेकेदारीही तेच घेतात, असे चित्र जवळपास सगळीकडे आहे. या महिला याला अपवाद ठरल्या आहेत. त्यांनी स्वतःची ठेकेदारी सुरू केलेली आहे आणि स्वतःच मजूर म्हणूनही कामे करतात.

काम घेणे, त्याची मजुरी ठरविणे, ही कामे शांताबाई चव्हण करतात; तर बाकी महिला त्यांना साथ देतात. मजुरी करताना चव्हाणबाई आणि सर्व महिला एकजुटीने काम करीत असतात. दिवसाकाठी जास्तीत जास्त साठ सिमेंट पोती खाली करतात. त्यांना प्रतिपोते 100 रुपये मजुरी मिळते. त्यासाठी खडी, वाळू याचे मिश्रण करावे लागते. अतिशय परिश्रम असलेले हे काम पुरुषांनाही कष्टदाई होते. ते काम या महिला अथकपणे करीत आहेत.

अवजड कामातील हा प्रकार आहे. या कामामध्ये पुरुष सिमेंट, वाळू, खडी यांचे मिश्रण करून महिला वाहतुकीसाठी हाताखाली काम करायच्या, अशी रीत या कामात असायची. या मक्तेदारीला महिलांच्या या ग्रुपने फाटा दिला आहे. आज ठेकेदार आणि मजूर दोन्ही भूमिका त्या बजावताना पुरुषांची या व्यवसायातील एकाधिकारशाही त्यांनी मोडीत काढली आहे. या त्यांच्या धाडसी कामगिरीने महिलांना नवीन संदेश मिळतो आहे. शिक्षण नसलेल्या महिला ’चूल आणि मूल’पर्यंत नाहीत, तर त्या ठेकेदारही होऊ शकतात, हे चित्र त्यांच्यामुळे स्पष्ट झाले आहे.

Back to top button