आंबेगाव तालुक्यात कांदा लागवड रखडली; वीज कर्मचारी संपाचा शेतकर्‍यांना फटका | पुढारी

आंबेगाव तालुक्यात कांदा लागवड रखडली; वीज कर्मचारी संपाचा शेतकर्‍यांना फटका

मंचर; पुढारी वृत्तसेवा : वीज कर्मचार्‍यांचा संपाचा फटका आंबेगाव तालुक्यातील शेतकर्‍यांना बसला आहे. अंदाजे पंधरा हजार शेती पंपांची वीज गायब झाल्याने पिकांना पाणी देता आले नाही. घरगुती वीजपुरवठा सुरू असला, तरी काही तांत्रिक कारणांनी तो केव्हाही खंडित होऊ शकतो, अशी भीती ग्राहकांनी व्यक्त केली.

आंबेगाव तालुक्यात सध्या कांदा लागवड सुरू आहे. वीज कर्मचार्‍यांनी संप पुकारल्याने शेती पंपाचा पुरवठा खंडित झाला. परिणामी, कांदा लागवड होऊ शकली नाही. अनेक शेतकर्‍यांच्या शेतात कामगार कांदे लागवडीसाठी आले होते. मात्र, वीज नसल्याने त्यांना बसून राहावे लागले. अनेक ठिकाणी वीज नसल्याने पिकांना पाणी देता आले नाही.

वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ नये, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीतील कर्मचारी सहभागी झाले आहेत. वीज कंपन्यांच्या जवळपास 30 संघटनांनी संपाला पाठिंबा दिला. पुढील 72 तास कुठलाही कर्मचारी कर्तव्यावर हजर राहणार नाही, असे महावितरण कंपनीचे तांत्रिक युनियनचे पुणे झोन अध्यक्ष शरद डगळे आणि सचिव सुरज मुलाणी यांनी सांगितले.

साडेतीनशे रुपये रोज देऊन 13 ते 14 महिला लागवडीसाठी आल्या. सकाळपासून वीज नसल्याने महिला बसून राहिल्या. दुसरीकडे कांदारोपे सुकून जाण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे.

                                            – वसंतराव विष्णू बाणखेले, स्थानिक शेतकरी

Back to top button