पुणे : महागाईच्या गर्तेत लोटण्याची राज्यकर्त्यांची नीती : शरद पवार यांची टीका | पुढारी

पुणे : महागाईच्या गर्तेत लोटण्याची राज्यकर्त्यांची नीती : शरद पवार यांची टीका

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘तुम्ही महागाईविरोधात आंदोलन हाती घेतले. देशाची सत्ता भाजपच्या हातात आहे. आजच्या राज्यकर्त्यांचे धोरण असे आहे, की शेतकर्‍यांना त्यांच्या घामाची किंमत द्यायची नाही. मध्यस्थांना संरक्षण द्यायचे. सामान्यांना महागाईच्या गर्तेत ढकलून द्यायचे. महागाईपासून त्यांची सुटका करायची नाही, ही राज्यकर्त्यांची नीती आहे,’ अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केली.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आयोजिलेल्या जनजागर यात्रेचा प्रारंभ पवार यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. जागर सावित्रींच्या लेकींचा-महागाई विरोधात, बेरोजगारी विरोधात अशी घोषणा देत ही यात्रा राज्याच्या कानाकोपर्‍यांत जाणार आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार डॉ. फौजिया खान, प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते पवार यांचा सत्कार
करण्यात आला.

पवार म्हणाले, ‘महागाईबरोबरच बेरोजगारीची समस्याही मोठी आहे. तुम्ही महागाई व बेरोजगारी समस्येबाबत गावोगावी जागर करणार आहात. शेतकरी उत्पादन वाढवितो आहे, पण सामान्यांच्या डोक्यावर महागाईचे संकट, हे या सरकारच्या आर्थिक धोरणामुळे आले आहे. जे आम्हाला महागाई देतात, त्यांना पुन्हा संधी द्यायची नाही.’

पवार म्हणाले, की मूळ प्रश्नावरून लोकांचे लक्ष अन्यत्र वेधून घेतात. प्रश्न सोडविता येत नसल्याने, ते जात, धर्म, भाषा याद्वारे समाजासमाजात वाद निर्माण करतात. राज्यात महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. विधानसभेत, लोकसभेतही आपणांस
संधी मिळेल.

खासदार सुप्रिया सुळे, फौजिया खान, वंदना चव्हाण, विद्या चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, सुरेखा ठाकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची भाषणे झाली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्वागत केले. राज्यातून आलेल्या अनेक महिलांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. वैशाली नागवडे यांनी सूत्रसंचालन केले.

Back to top button