पुणे : गावठाणांचे ड्रोन सर्वेक्षण मार्चपर्यंत पूर्ण करणार : अनिल माने यांची माहिती | पुढारी

पुणे : गावठाणांचे ड्रोन सर्वेक्षण मार्चपर्यंत पूर्ण करणार : अनिल माने यांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या ‘स्वामित्व’ योजनेंतर्गत अद्याप सर्वेक्षण न झालेल्या गावठाणांचे ‘ड्रोन सर्वेक्षण’ येत्या मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती भूमिअभिलेख विभागाचे उपसंचालक अनिल माने यांनी दिली. दरम्यान, पुणे विभागात पाच जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या या सर्वेक्षणात आतापर्यंत सहा हजार 136 गावांपैकी पाच हजारांहून अधिक गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, उर्वरित गावांच्या सर्वेक्षणासाठी भूमी अभिलेख विभागाने तीन महिन्यांची मुदत दिली आहे.

विभागातील यापूर्वी 1904 गावांचे सर्वेक्षण झाले आहे. पाच हजार 133 गावांपैकी 213 गावांचे प्रॉपर्टी कार्ड (मिळकत पत्रिका) ऑनलाईन उपलब्ध झाली आहेत. 213 गावांमध्ये सुमारे एक लाख 42 हजार एवढे प्रॉपर्टी कार्ड तयार झाले आहेत. ड्रोन सर्वेक्षण झालेल्या गावठाणांचा नकाशा तयार करणे शक्य होणार आहे.प्रॉपर्टी कार्डाच्या आधारे सनद तयार करता येते, अशीही माहिती देण्यात आली.

पुणे विभागातील सहा हजार 136 गावे असून, त्यापैकी पाच हजार 133 गावांचे ड्रोन सर्वेक्षण झाले आहेत. त्यापैकी 213 गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार झाले आहेत. तसेच 1218 गावांमधील प्रॉपर्टी कार्डचा माहितीसाठा तयार आहे.

                             अनिल माने, उपसंचालक भूमी अभिलेख, पुणे विभाग

Back to top button