म्हाडाची घर नोंदणी आजपासून; पुणे, पिंपरी-चिंचवडमधील तब्बल 5,915 सदनिकांसाठी सोडत जाहीर | पुढारी

म्हाडाची घर नोंदणी आजपासून; पुणे, पिंपरी-चिंचवडमधील तब्बल 5,915 सदनिकांसाठी सोडत जाहीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल 5,915 सदनिकांसाठी ‘म्हाडा’कडून सोडत जाहीर करण्यात आली आहे. ‘म्हाडा’च्या विविध योजनांतील 2,594 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत 2,990, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 396, अशा एकूण 5,915 सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा ऑनलाइन नोंदणीचा प्रारंभ गुरुवारी (5 जानेवारी) होणार आहे.

ही सोडत नवीन संगणकप्रणाली आयएचएलएमएस 2.0 नुसार होणार आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना घरबसल्या संकेतस्थळ किंवा मोबाईल उपयोजनेच्या माध्यमातून सदनिकेसाठी नोंदणी करता येणार आहे. नोंदणी, अर्ज भरणे आणि ऑनलाइन पैसे भरणे, या सुविधा या प्रणालीद्वारे करता येणार आहेत.

दरम्यान, म्हाडाच्या पुणे मंडळाकडून सन 2016 पासून ऑनलाइन पद्धतीने 34 हजार 493 सदनिकांचे वितरण केले आहे. त्यापैकी 20 टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत 11 हजार सदनिकांची सोडत काढून वितरण करण्यात आले. सन 2020-21 या काळात कोरोना असतानाही पुणे मंडळामार्फत 15 हजार 477 सदनिकांचे ऑनलाइन पद्धतीने सोडत काढून वितरण करण्यात आले, असे माने-पाटील यांनी सांगितले.

अकरा वाजता नोंदणीचा प्रारंभ
सोडतीच्या ऑनलाइन नोंदणीचा प्रारंभ गुरुवारी सकाळी 11 वाजता म्हाडा पुणे मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने-पाटील यांच्या हस्ते म्हाडाच्या कार्यालयात होणार आहे. तसेच, सदनिकांची ऑनलाइन सोडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (6 जानेवारी) सकाळी साडेदहा वाजता नेहरू मेमोरिअल सभागृह, लष्कर येथे होणार आहे, अशी माहिती म्हाडा पुणे मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली.

सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी 6 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून भरता येणार आहे. ऑनलाइन पैसे 7 जानेवारीपासून भरता येणार आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 5 फेब्रुवारी रोजी रात्री 11.59 पर्यंत असेल. ऑनलाइन पैसे भरण्याची अंतिम तारीख 6 फेब्रुवारी रात्री 11.59 पर्यंत आहे. सोडतीची प्रारूप यादी 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध होईल, तर अंतिम यादी 15 फेब्रुवारीला प्रसिद्ध होईल. यशस्वी अर्जदारांची यादी ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
नितीन माने पाटील, मुख्याधिकारी, म्हाडा

Back to top button