नारायणगावजवळ ड्रग्जस विकण्यासाठी आलेल्या व्यक्तीला अटक | पुढारी

नारायणगावजवळ ड्रग्जस विकण्यासाठी आलेल्या व्यक्तीला अटक

नारायणगाव (पुणे), पुढारी वृतसेवा: स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व नारायणगाव पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करून नारायणगाव येथील ओझर फाटा (ता. जुन्नर) या ठिकाणी मेफेड्रोन ड्रग विक्रीसाठी आलेल्या इसमाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम ड्रग्स व ३ लाख रुपयांची स्विफ्ट कार असा ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर व सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी ही माहिती दिली. मंजर बशीर खान (रा.शिपाई मोहल्ला, जुन्नर, जि.पुणे) असे पोलिसांनी पकडलेल्या इसमाचे नाव आहे. मंगळवारी (दि.३) स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नारायणगाव पोलिस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून ओझर फाट्यावर एक इसम मेफेड्रोन नावाचा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील मुद्देमाल ताब्यात घेऊन त्यास पुढील तपासासाठी नारायणगाव पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे ,जुन्नर उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलिस सब इन्स्पेक्टर गणेश जगदाळे,पोलिस सब इन्स्पेक्टर जगदेव पाटील, हवालदार दीपक साबळे, नायक संदीप वारे, कॉन्स्टेबल अक्षय नवले, नायक दिनेश साबळे, कॉन्सटेबल सचिन कोबल यांनी केली.

Back to top button