मंचर : ग्रामपंचायत सदस्य सुरक्षित ठेवण्याची धडपड | पुढारी

मंचर : ग्रामपंचायत सदस्य सुरक्षित ठेवण्याची धडपड

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  राज्यभरातील सरपंचांची निवड थेट जनतेतून पार पडली असून, राज्यभरातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांमधून उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. ही निवड होत असताना सध्या आपल्या गटाचा उपसरपंच व्हावा, यासाठी प्रत्येक गट प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सदस्य फोडाफोडी, पळवापळवी, तर दुसरीकडे स्वतःचे सदस्य सुरक्षित ठेवण्याचे काम ग्रामपंचायत पॅनेलप्रमुखांना करावे लागत आहे.

अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या वेळी सरपंचपद थेट जनतेतून निवडून आले. त्यामुळे सरपंचपदाच्या निवडी पार पडल्या आहेत. आता सदस्यांमधून उपसरपंचपदाच्या निवडी पार पडणे सुरू झाले आहे. त्यामुळे उपसरपंचपदासाठी सदस्यांमधील अनेक इच्छुक आपापल्या पद्धतीने प्रयत्न करताना पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामपंचायत सदस्य आपल्या बाजूने कसे येतील, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी विरोधी गटातील सदस्य फोडून स्वतःच्या गटात सामील करून घेण्यासाठी देखील प्रयत्न सुरू झाले आहेत.

दरम्यान, आपल्या गटातील सदस्य फुटू नये, यासाठी अनेक ग्रामपंचायतींच्या पॅनेलप्रमुखांनी आपले सदस्य अज्ञातस्थळी हलविले आहेत. त्यामुळे सध्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत रंगत आली आहे. ग्रामपंचायत सदस्य पळवापळवी आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कष्ट उपसरपंचपदासाठी इच्छुक असणारे उमेदवार तसेच पॅनेलप्रमुख घेत आहेत. त्यातच ग्रामपंचायत सदस्यांची संख्या विषम जरी असली, तरीही सरपंचपद धरून सम संख्या होत आहे.जनतेतून निवडले गेल्यानंतर सरपंच झालेल्यांना उपसरपंचपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार प्राप्त असल्यामुळे अनेक गावांमध्ये समसमान मते होणार आहेत.

सरपंचांना दोन मतांच्या  अधिकाराबाबत नाराजी

एखाद्या गटाचे पाच सदस्य निवडून आले, तर दुसर्‍या गटाचे चार सदस्य निवडून आले असतील तर अशा परिस्थितीत सरपंचपदी निवडून आलेल्या उमेदवाराने आपले मत चार सदस्य असणार्‍या बाजूने टाकले, तर अशा ठिकाणी पाच-पाच अशी समसमान मतसंख्या होते. अशावेळी पुन्हा एकदा सरपंचांना अतिरिक्त मत देण्याचा अधिकार आहे. या अतिरिक्त मताचा अधिकार वापरून सरपंच पुन्हा एकदा चार सदस्यसंख्या असणार्‍या बाजूने उपसरपंचपदासाठी मत टाकू शकतो. अशावेळी सदस्य म्हणून निवडून आलेल्या पाच जणांच्या गटापेक्षा चार जणांचा गट हा सरपंचामुळे ताकदवान होत आहे. या निर्णयाबाबतीत देखील काही ठिकाणी नाराजी दिसून येत आहे.

महिला सदस्यांना  मोठे महत्त्व
महिला आरक्षण 50 टक्के असल्यामुळे निम्म्या ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज आले आहे. अशा ठिकाणी उपसरपंचांना काही वेळेस जास्त महत्त्व येते. त्यामुळे देखील उपसरपंचपद हे महत्त्वाचे ठरते. उपसरपंचपदाच्या निवडी सुरू झाल्या असून, सध्यातरी जोरदार रस्सीखेस ग्रामपंचायतीमध्ये सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.

Back to top button