पुणे : राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी काका कोयटे यांची फेरनिवड | पुढारी

पुणे : राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी काका कोयटे यांची फेरनिवड

पुणे : प्रतिनिधी :  महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे (अहमदनगर) यांची फेरनिवड झाली आहे. फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली असून पुण्यात मंगळवारी (दि.4) झालेल्या नवीन संचालकांच्या बैठकीत पदाधिकार्‍यांची निवड एकमताने झाल्याचे कळविण्यात आले आहे.

फेडरेशनचे अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे. : कार्याध्यक्ष ः अ‍ॅड. दीपक पटवर्धन (रत्नागिरी). महासचिव शशिकांत राजोबा (सांगली). उपाध्यक्ष ः वसंतराव शिंदे (मुंबई), डॉ. शांतीलाल सिंगी (औरंगाबाद). खजिनदार दादाराव तुपकर (जालना). उप कार्याध्यक्ष ः सुरेश पाटील (रायगड), अ‍ॅड. अंजली पाटील (नाशिक), चंद्रकांत वंजारी (ठाणे), नारायण वाजे (नाशिक). सह सचिव ः भारती मुथा (पुणे), शरद जाधव (पालघर), जवाहर छाबडा (कोल्हापूर), भास्कर बांगर (पुणे). समन्वयक ः राजुदास जाधव (यवतमाळ).
सहकार विभागाचे पुणे विभागीय उप निबंधक दिग्विजय आहेर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांसह सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी, फेडरेशनचे संचालक राधेश्याम चांडक (बुलडाणा), धनंजय तांबेकर (नांदेड), रवींद्र भोसले (सातारा), वासुदेव काळे (अहमदनगर), सुभाष आकरे (गोंदिया), नीलिमा बावणे (नागपूर), मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे आदी उपस्थित होते.

विद्यमान अध्यक्ष काका कोयटे यांनी 1990 सालापासून पतसंस्था फेडरेशनवर प्रथम संचालक, सहसचिव, महासचिव या पदांवर काम केले. गेली 14 वर्षे ते अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. राज्यभर 16 हजार पतसंस्थांचे नेतृत्व करणार्‍या या संस्थांचे सव्वा दोन कोटी सभासद असून, दोन लाखांवर पदाधिकारी आहेत. तसेच पतसंस्थांच्या तब्बल 50 हजार शाखा आहेत. त्यातील दोन लाख दैनंदिन ठेव प्रतिनिधींमार्फत राज्यभरातील एक कोटी कुटुंबांशी, म्हणजेच सुमारे तीन ते चार कोटी व्यक्तींशी या पतसंस्था चळवळीचा संपर्क येतो. फेडरेशनने शिर्डी येथे स्वत:चे अद्ययावत व सुसज्ज असे प्रशिक्षण केंद्रही उभारले आहे.

“राज्यभरातील पतसंस्थांनी पुन्हा एकदा त्यांचा प्रतिनिधी होण्याचा बहुमान दिल्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. ही निवड होण्यात सर्व नवीन संचालकांबरोबरच सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी यांचेही सहकार्य लाभले. यापुढील काळात प्राप्तिकर खात्याकडून येणार्‍या नोटिसांबद्दलही मार्चअखेरपर्यंत दिलासादायक निर्णय घेण्याचा प्रयत्न आहे. आयकर खात्याने दिलासा न दिल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल.
                    – काका कोयटे, अध्यक्ष, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन.

Back to top button