बारामती: ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने पाच वर्षीय बालक ठार, चोपडजनजीकची घटना | पुढारी

बारामती: ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने पाच वर्षीय बालक ठार, चोपडजनजीकची घटना

बारामती, पुढारी वृत्तसेवा: ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेला पाच वर्षीय बालक दुचाकीवरून खाली पडत ट्रॅक्टरच्या चाकाखाली गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. शौर्य चेतन काळे (रा. चोपडज, ता. बारामती) असे या अपघातात ठार झालेल्या बालकाचे नाव आहे. मंगळवारी (दि. ३) सकाळी पावणे अकराच्या सुमारास चोपडज- वाकी रस्त्यावर जगताप वस्ती येथे ही घटना घडली.

याबाबत वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात धर्मेंद्र जीवधर काळे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार ट्रॅक्टर चालक रोहन उर्फ दत्तात्रय रवींद्र साळवे (रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती) याच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला.

फिर्यादीचा भाऊ चेतन हे त्यांची पत्नी प्रतिक्षा व मुलगा शौर्य यासह दुचाकीवरून (एमएच १४ क्यू ३३७९) वरून कानावडवाडी येथून वाकी-चोपडज रस्त्याने चोपडजकडे जात होते. जगताप वस्तीजवळ चोपडज बाजूकडून येणाऱ्या ट्रॅक्टरने चुकीच्या दिशेने येत त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवर बसलेला शौर्य हा गाडीवरून खाली पडला. ट्रॅक्टचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला.

Back to top button