मनस्ताप! अंत नका पाहू, नवीन वर्षात तरी महामार्गावरील वाहतूककोंडी दूर होईल का? | पुढारी

मनस्ताप! अंत नका पाहू, नवीन वर्षात तरी महामार्गावरील वाहतूककोंडी दूर होईल का?

मिलिंद शुक्ल

पिंपरी : पिंपरी-चिंचवडहून पुण्यात जाणे म्हणजे वाहतूककोंडीतून वाट काढण्याचे एक दिव्यच पार करावे लागते, असे म्हटल्यास अतिशयोक्ती वाटू नये. या कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालकांना दररोज मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या नववर्षात तरी ही वाहतूककोंडी दूर होईल का, असा प्रश्न वाहनचालकांतून उपस्थित केला जात आहे.

पिंपरी-चिंचवडहून पुण्यात जाण्यासाठी दररोज मोठ्या वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना तसेच वाहन चालकांनाही प्रचंड मनस्ताप होतो. वाहतुककोंडीमुळे अर्धा तासाच्या प्रवासाला सुमारे तासभराचा वेळ लागत असल्याने आता अंत नका पाहू म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खडकी रेल्वेस्टेशन दरम्यान मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे पिंपरीकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक दापोडी (हॅरिस पूल) पासून खडकीच्या दिशेने वळविण्यात आली आहे. खडकीतील आतील रस्ते अरूंद असल्याने खडकीबाजारापर्यंत रोज सकाळी तसेच सायंकाळी मोठी वाहतूककोंडी होते.

पिंपरी ते दापोडी दरम्यानही मेट्रोचे काम सुरू
आहे. परंतु येथील रस्ते प्रशस्त आहेत. एका बाजूने तीन पदरी रस्ता आहे; तसेच बीआरटीचा मार्ग वेगळा असून ग्रेेडसेपरेटरमधूनही वाहने धावत असल्याने दापोडीपर्यंतचा प्रवास सुखकर होतो; मात्र पुढे बोपोडी व खडकी रेल्वेस्थानका दरम्यानचा रस्ता अरुंद असल्यामुळे येथे गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूककोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता मेट्रोच्या कामाचे निमित्त झाले आहे. त्यामुळे सध्या पिंपरीहून शिवाजीनगरकडे जाणार्‍या वाहनांची खडकी चौकात कोंडी होत आहे. या कोंडीमुळे दापोडी परिसरात महामार्गावर वाहनांच्या रांगा लागतात.

समांतर पूल महत्त्वाचा
यापूर्वी हॅरिस ब्रीज हा एकच पूल होता. त्यामुळे पुण्यात जाताना दापोडी परिसरात मोठी वाहतूककोंडी होत असे. मात्र, येथे समांतर पूल उभारावा, अशी मागणी अनेक वर्षे होत होती. त्याप्रमाणे येथे समांतरपूल हा दोन्ही महापालिका पुणे आणि पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त सहभागाने उभारण्यात आला. 2016 ते 2019 साधारण तीन वर्षे त्याचे काम चालले. या पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली.

मार्ग मोकळा होण्याची चिन्हे
सरत्या वर्षाच्या अखेरीस 31 डिसेंबर रोजी फुगेवाडी ते पुणे, अशी मेट्रो धावल्याने दापोडी-खडकी चौकातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. कारण ऑगस्ट 22 ते डिसेंबर 2022 मेट्रोचे काम पूर्ण झाल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी जाहीर केले आहे.

हे आहेत पर्याय
1) मेट्रोचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. दापोडी – खडकी चौकाकडून शिवाजीनगरकडे जाणारा रस्त्यावरील राडारोडा साफ केल्यास हा रस्ता वापरासाठी खुला केला जाऊ शकतो. हा रस्ता पुन्हा चालू झाल्यास वाहतूककोंडी काही प्रमाणावर कमी होऊ शकेल. 2) मोठी व अवजड वाहने एका मार्गाने आणि दुचाकी, कार व इतर छोटी वाहने दुसर्‍या रस्त्याने वळविल्यास वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी होईल.

बोपोडी येथील अतिक्रमणाचा प्रश्न पालिकेच्या मध्यस्थीने आणि नागरिकांच्या सहकार्याने मार्गी लागला आहे. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्गाचे काम आता लवकर होईल, त्याच्या सिमेंटीकरणाची सुरुवातही झाली आहे. त्यास साधारण 2 महिने लागतील. या चौकातून वाहतूक सुरळीत होण्यासाठीचा प्रस्ताव पुणे पालिकेस देण्यात आला आहे. मेट्रो आणि महापालिका मिळून त्यावर लवकरच कार्यवाही केली जाईल.

                                                                   -प्रकाश मासाळकर,
                                                              पोलिस निरीक्षक (वाहतूक)

मला कामानिमित्त दररोज सकाळी पुण्याहून पिंपरीत कामासाठी जावे लागते. आमची गाडी ही जुन्या महामार्गावरून जाते. खडकीकडून पुढे दापोडी, पिंपरीकडे जाताना दररोज वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. त्यामुळे कंपनीत जायला उशीर होतो.

                                                                             – शेखर वैद्य, कर्वेनगर

मला कामानिमित्त्त पुण्यात जावे लागते. साधारण 10 ते 11 दापोडी-खडकी चौकातून जावे लागते. त्या वेळी या चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याने कोंडी होते. या कोंडीमध्ये बराच वेळ अडकून पडावे लागते.

                                                                               -ज्ञानेश ठुसे, चर्‍होली

Back to top button