महत्वाची बातमी : नगर-दौंड वाहतूक दोन दिवस बंद | पुढारी

महत्वाची बातमी : नगर-दौंड वाहतूक दोन दिवस बंद

वाळकी; पुढारी वृत्तसेवा : दौंड महामार्गावर व्हीआरडीईजवळ असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गावरील गेटच्या अत्यावश्यक दुरुस्तीमुळे या महामार्गावरील वाहतूक दोन दिवस बंद ठेवण्यात आली आहे. या मार्गावरून जाणारी सर्व वाहतूक बाह्यवळण रस्त्याने वळविण्यात आली आहे. नगर-दौंड महामार्गावर व्ही आर डी ई जवळ या महामार्गाला क्रॉस करत नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग गेला आहे.

या ठिकाणी उड्डाणपूल नियोजित आहे. मात्र, त्याचे काम अद्याप सुरू झाले नाही. त्यामुळे या मार्गावर रेल्वे प्रशासनाने गेट ठेवले आहे. ज्या वेळी रेल्वेगाडी नगरहून आष्टीकडे किंवा तिकडून नगरकडे येणार असेल त्यावेळी हे गेट महामार्गावरील वाहनांसाठी बंद करण्यात येत असते. या गेटचे अत्यावश्यक दुरुस्तीचे काम करण्यासाठी हे गेट दोन दिवस बंद ठेवण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाने सोमवारी (दि.2) सकाळी 9 वाजेपासून रेल्वेगेटच्या दुरुस्तीचे काम सुरू केले असून ते मंगळवारी (दि.3) सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. या कामामुळे सदर रेल्वे गेट बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या महामार्गावर दौंड कडून येणारी सर्व प्रकारची वाहतूक अरणगाव बायपासमार्गे पुणे महामार्ग तसेच सोलापूर महामार्गावरून वळविण्यात आली आहे. या बाबतची पूर्वसूचना रेल्वे प्रशासनाने अरणगाव,खंडाळा, खडकी ग्रामपंचायत तसेच व्ही आरडीई प्रशासन, जिल्हा प्रशासन, वाहतूक शाखा, पोलिस यंत्रणा यांना यापूर्वीच दिली आहे.

Back to top button