अजित पवारांचा पुतळा जाळल्याप्रकरणी २८ जण ताब्यात, बारामती पोलिसांची कारवाई | पुढारी

अजित पवारांचा पुतळा जाळल्याप्रकरणी २८ जण ताब्यात, बारामती पोलिसांची कारवाई

बारामती, पुढारी वृत्तसेवा: छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीच्या वक्तव्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याप्रकरणी शहर पोलिसांकडून २८ जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली.

पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी ही माहिती दिली. पवार यांचे खासगी निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीसमोर त्यांच्या विरोधात निषेधाचे फलक हाती घेत कापडी पुतळा सोमवारी (दि. २) जाळण्यात आला. या आंदोलकांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. या प्रकरणी भाजप कार्यालयाजवळून मोर्चा निघणार होता. त्यामुळे पोलिसांनी तिकडे बंदोबस्त लावला असताना अचानक बाहेरून आलेल्यांनी सहयोग सोसायटीसमोर जमत आंदोलन केले. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी कर्मचाऱ्यांसह तेथे जाऊन आंदोलकांना ताब्यात घेत त्यांच्याकडील फलक व झेंडे जप्त केले.

या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक सीताराम काटे (रा. सराटी, ता. इंदापूर), मच्छिंद्र शंकर टिंगरे (रा. झारगडवाडी, ता. बारामती), अभिषेक अण्णासाहेब कोळेकर (रा. तरंगवाडी, ता .इंदापूर), अक्षय चंद्रकांत चव्हाण (रा. भिगवण रोड, बारामती), ओंकार किशोर बनकर (रा. लाटे, ता. बारामती), दादासो रामचंद्र बरकडे (रा. कटफळ, ता. बारामती), ओंकार संजय फडतरे (रा. सणसर, ता. इंदापूर), अमर सुनील दळवी (रा. भवानीनगर, ता इंदापूर), अक्षय कल्याण गुलदगड (रा. पाटेगाव, ता. कर्जत, जि. नगर), रोहित गोविंद इचके (रा. कर्जत, जि. नगर), गणेश भीमराव पडळकर (रा. अकोले, ता. इंदापूर), सागर जालिंदर पवार (रा. बेलवाडी, ता. इंदापूर), स्वप्निल कैलास जोगदंड (रा. कर्जत), औदुंबर अशोक भंडलकर व दत्ता लालासो बोडरे (रा. भादलवाडी, ता. इंदापूर), अक्षय राजेंद्र गायकवाड (रा. कर्जत, जि. नगर), आनंद सोमनाथ शेंडे (रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर), युवराज वामन माकर (रा. उंडवडी कडेपठार, ता. बारामती), सुरज बिभिषण पासगे (रा. वडापुरी, ता. इंदापूर), सागर बाळू मोरे (रा. वरकुटे खुर्द, ता. इंदापूर), अनिकेत बाळू भोंग, प्रणव रुद्राक्ष गवळी (रा.इंदापूर), संकेत संतोष काळभोर (रा. सणसर, ता. इंदापूर), अर्थव रोहित तरटे, रोहन प्रकाश शिंदे, वैभव सोमनाथ शिंदे (रा. कर्जत), किरण रवींद्र साळुंखे (रा. भवानीनगर, ता इंदापूर) व चंद्रकांत प्रल्हाद खोपडे (रा. तावशी, ता. इंदापूर) यांचा समावेश आहे. पोलिस कर्मचारी कल्याण खांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्यांच्याविरोधात भादंवि कलम १४३, १४९ सह मुंबई पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल करत अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे याबाबत तपास करीत आहेत.

Back to top button