साखर उत्पादनातील महाराष्ट्राचा डंका कायम राहणार | पुढारी

साखर उत्पादनातील महाराष्ट्राचा डंका कायम राहणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशात चालूवर्ष 2022-23 या यंदाच्या ऊस गाळप हंगामामध्ये 357 लाख टनाइतके साखरेचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. त्यामध्येे 134 लाख टनाइतक्या सर्वाधिक साखर उत्पादनासह देशात महाराष्ट्राचा साखर उत्पादनातील अग्रस्थानाचा डंका कायम राहील. त्या खालोखाल उत्तरप्रदेश 104 लाख टन आणि 72 लाख टन साखर उत्पादनासह कर्नाटक तिसर्‍या स्थानावर राहण्याचा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी वर्तविला आहे. महाराष्ट्रातील 188 कारखान्यातून 134 लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्या खालोखाल उत्तरप्रदेशातील 120 कारखान्यातून 104 लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे.

कर्नाटकातील 72 कारखान्यात गाळप चालू असून त्यातून 60 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. या तीन राज्यांशिवाय तामिळनाडूत 14 लाख टन तर गुजरातमध्ये 12 लाख टनाइतके साखरेचे उत्पादन होण्याचे अपेक्षित आहे. 30 डिसेंबर 2022 पर्यंत देशातील 498 साखर कारखान्यात 1 हजार 281 लाख 82 हजार टनाइतके ऊस गाळप पूर्ण झाले आहे. त्यातून देशात सद्यस्थितीत 119 लाख 35 हजार टन साखर तयार झाली आहे. यापैकी महाराष्ट्रातील 188 कारखान्यांतून 46.20 लाख टन, उत्तर प्रदेशातील 120 कारखान्यातून 31.30 लाख टन, आणि कर्नाटकातील 72 कारखान्यांकडून 26 लाख टनाइतके साखरेचे उत्पादन झाले आहे. 2021-22 या वर्षी देशातील 491 कारखान्यातून 359.25 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. चालू वर्ष 2022-23 मध्ये साखर कारखान्यांची संख्या सातने वाढल्याचेही नाईकनवरे यांनी सांगितले.

Back to top button