पिंपळे गुरवमध्ये महापालिकेच्या आरक्षित जागेत वाहनतळ | पुढारी

पिंपळे गुरवमध्ये महापालिकेच्या आरक्षित जागेत वाहनतळ

नवी सांगवी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकातील बॅडमिंटन हॉलसमोरील मोकळ्या जागेत महापालिकेची खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जागा आहे. मात्र, महापालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे येथील मोकळ्या जागेत एक प्रकारे पार्किंगसाठी वाहनतळ निर्माण झाले आहे.  महापालिकेच्या आरक्षित जागेत महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता शेकडो वाहने दिवस रात्र पार्क केली जात आहेत. त्यामुळे येथील मोकळ्या जागेत रात्रीच्या सुमारास मद्यपी, धूम्रपान करणार्‍यांचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाहने पार्क केलेल्या अडगळीच्या ठिकाणी रात्रीच्या सुमारास ठिय्या मांडून मद्यपान, धूम्रपान होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

याचा नाहक त्रास परिसरात वास्तव्य करणार्‍या उच्चभ्रू सोसायटीतील नागरिकांना सहन करावा लागत आहे. भरदिवसा, सायंकाळच्या सुमारास अनेक तरुण तरुणी वाहन पार्क केलेल्या अडगळीत जाऊन गप्पा मारताना, चाळे करताना दिसून येत आहेत. त्यामुळे या परिसरातून ये-जा करणार्‍या नागरिकांना महिलांना लज्जास्पद वाटत आहे. येथील परिसरात मोकळ्या जागेत वाहने पार्क करणार्‍या वाहन चालकांमुळे याचा गैरफायदा इतर घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. अनेकदा या परिसरात मद्यपान करून रात्रीच्या सुमारास वादविवाद, भांडण तंट्याचे प्रमाणही वाढत चालले आहे.

याकडे सांगवी पोलिस प्रशासन हाकेच्या अंतरावर असूनही दुर्लक्ष करीत आहे. तर संबंधित महापालिका प्रशासनदेखील याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या मोकळ्या जागेत स्वतःचे वाहन पार्क करणारे येथील परिसरात राहत नसून ते इतरत्र राहत असल्याचे समजते. रात्रीच्या सुमारास तर शेकडो वाहने पार्क केलेली दिसून येत असतात. अक्षरशः येथे वाहनतळ असल्यासारखे वाटते. मुख्य रस्त्यावरून अथवा पार्क केलेली वाहने मुख्य रस्त्यावर येत असताना अनेक अपघात घडून आले आहेत.

संबंधित महापालिका प्रशासनाने येथील मोकळ्या आरक्षित जागेत, तसा फलकही लावला आहे. तरी देखील कशाचीही तमा न बाळगता वाहनचालक अनधिकृतरित्या वाहने पार्क करीत आहेत. महापालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष न करता आरक्षित जागेवर सीमा भिंत अथवा तारेचे कुंपण बांधून अनधिकृतरीत्या वाहने पार्क करणार्‍यांवर आळा बसविण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

येथील मोकळ्या जागेत वाहन पार्क होत असल्याने दिवसा अपरात्री गैरप्रकार होत आहेत. रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेला लागून मंदिर आहे. मंदिरात सकाळ संध्याकाळी आल्यावर हे प्रकार आढळून येत असल्याचे पहावयास मिळतात. बोपोडी, दापोडी, कासारवाडी, कल्पतरु, लक्ष्मी नगर, साठ फुटी रोड या ठिकाणी राहणारे वाहनचालक येथील मोकळ्या जागेत आपली वाहने पार्क करून जात आहेत.
                                                   – सुरेश जाधवर, स्थानिक नागरिक

हे आरक्षण आता क्रीडा विभागाच्या ताब्यात आहे. क्रीडा विभागाशी बोलून घेतो. तरी पाहणी करून अतिक्रमण विभागामार्फत सांगवी पोलिसांची मदत घेऊन कार्यवाही करू. तसेच पार्किंगचा विषय असल्याने वाहतूक पोलिस यांना कळवावे लागेल. त्यानंतरच कार्यवाही करता येईल.
                                                 -विजयकुमार थोरात, ह क्षेत्रीय अधिकारी

Back to top button