खडकी; पुढारी वृत्तसेवा : खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीत अनेक ठिकाणी दुकानांसमोर खाद्यपदार्थांच्या स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. या स्टॉलधारकांकडे कोणत्याही प्रकारचे परवाने नाहीत. प्रशासनाने या स्टॉलधारकांची चौकशी करावी, अशी मागणी पस्तीस, सदोतीस फाउंडेशनचे संस्थापक युवराज राठोड, अध्यक्ष आकाश गायकवाड यांनी केली आहे. परिसरात काही व्यावसायिकांनी दुकानांसमोर खाद्यपदार्थांच्या स्टॉलसाठी भाडेतत्वाने जागा दिली आहे.
या स्टॉलवर चहा, वडापाव, पाणीपुरी, चायनीज, जिलेबी, इडली, वडे आदी खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे. मात्र, हे स्टॉलचालक खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी घरगुती सिलिंडरचा वापर करीत आहेत. तसेच या स्टॉलधारकांकडे व्यवसायाचे कोणत्याही प्रकारचे परवाने नाहीत. काही दिवसांपूर्वी खडकी बाजारातील एका दुकानांमधील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर पोलिसांनी छापे मारले होते. यात स्टॉलधारकांकडे नकली नोटा मिळाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व स्टॉलधारकांची चौकशी करण्याची मागणी राठोड व गायकवाड यांनी केली आहे.
खडकी परिसरातील दुकानदारांना आम्ही परवाने देतो. ते दुकानांसमोर स्टॉल लावत असून, याबद्दल कोणतेही प्रकारची कारवाई प्रशासनाकडून केली जात नाही. याबाबत संपूर्ण जबाबदारी दुकानचालकांची आहे. मात्र, दुकाने व स्टॉलमधून आरोग्याच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा आढळून आल्यास कारवाई करण्यात येते.
-शिरीष पत्की,
आरोग्य अधीक्षक, खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड