कोरेगाव भीमाच्या लढाईने राजकीय गुलामी संपली : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे मत | पुढारी

कोरेगाव भीमाच्या लढाईने राजकीय गुलामी संपली : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे मत

कोरेगाव भीमा : देशात हजारो वर्षे राजकीय गुलामी होती. पण, कोरेगाव भीमाच्या लढाईने ही गुलामी संपली. भारतीय स्वातंत्र्याचा सामाजिक आणि राजकीय इतिहासाला येथूनच सुरुवात झाली. त्यामुळे आजच्या दिवशी नागरिक याठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यामुळे मी आजचा दिवस आनंदाचा मानतो, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

येथील विजयरणस्तंभ अभिवादनासाठी आलेल्या नेत्यांनी अभिवादनानंतर पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी अ‍ॅड. आंबेडकर बोलत होते. करणी सेनेचे अध्यक्ष अजय सेंगर यांनी जे वक्तव्य केले त्याबाबत अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, कोणी काय विधान करावे ते त्यांनी विचारपूर्वक करावे, नाहीतर ते त्यांच्याच अंगलट येते, अशी सध्याची परिस्थिती आहे. कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यास अद्यापपर्यंत कोणताही नेता आला नाही, यावर अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, कोणी अभिवादन करायला यायचे आणि न यायचे हा त्यांचा प्रश्न आहे.

शंभर एकर जमीन हवी : रामदास आठवले
शौर्यदिनी येथे लाखोच्या संख्येने लोक येत असतात. त्यामुळे स्तंभासाठी 100 एकर जमीन हवी. ही जमीन संपादन केल्यानंतर मग या ठिकाणी स्मारक उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी करणार आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. ते म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या तसेच समाजाच्या वतीने मी अभिवादन करायला आलो आहे. अतिक्रमण हटवून येथे विकासासाठी 100 एकर जमीन मिळाल्यास स्मारकही उभे राहील. त्यासाठी समाज कल्याण विभाग निधी देईल.

मानवंदना देणे चुकीचे नाही : जितेंद्र आव्हाड
मानवंदना देणे चुकीचे नाही. एवढ्या मोठ्या सैन्याला हरवणे अवघड होते, त्याचा हा इतिहास आहे. सरकारची मानसिकता कशी आहे, हे कसे सांगणार. पालकमंत्री आणि सरकारवर बोलायचे नसल्याने येथे कोण येते, कोण नाही येत, त्यावरही मला बोलायचे नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केले.

चिल्लर लोकांवर बोलणार नाही : सुषमा अंधारे
वर्षाची सुरुवात ही एका ऊर्जादायी दिवसाने आणि या ठिकाणी अभिवादन करून केली आहे. करणी सेनेसारख्या चिल्लर लोकांवर मी काही बोलणार नाही, पण त्यांचे जे बोलविते धनी आहेत, त्यांनी हे बोलून दाखवले, तर मग त्यांना आंबेडकरी जनता काय आहे हे दाखवून देऊ. सत्तेतील कोणतेही नेते येथे येतील ही अपेक्षाही आम्ही करत नाही.

 

Back to top button