नववर्षाचा प्रारंभ देवदर्शन,पर्यटनाने; श्री महालक्ष्मी मंदिर, सिद्धिविनायक, दगडूशेठ गणपतीसमोर पुणेकरांच्या रांगा | पुढारी

नववर्षाचा प्रारंभ देवदर्शन,पर्यटनाने; श्री महालक्ष्मी मंदिर, सिद्धिविनायक, दगडूशेठ गणपतीसमोर पुणेकरांच्या रांगा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नववर्ष आणि वीकेंडच्या सुटीमुळे रविवारी नागरिकांनी शहरातील-श्री महालक्ष्मी मंदिर,सारसबागेतील सिद्धिविनायक, दगडूशेठ हलवाई गणपतीसह विविध मंदिरात जाऊन दर्शन घेतले. रात्री उशीरापर्यंत मंदिरात गर्दी पाहायला मिळाली. तसेच शनिवारवाडा, तळजाई टेकडी, पर्वती, आगाखान पॅलेससह कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात जाऊन नववर्षाचा आनंद लुटला. ठिकठिकाणचे हॉटेल्स व खाऊ गल्ल्ल्या हाऊसफुल्ल झाल्या होत्या.

कात्रजच्या उद्यानात तर तब्बल 25 हजार 760 नागरिकांनी भेट दिली. त्यातून 9 लाख 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेले दोन वर्षे कोरानाच्या सावटाखाली गेल्याने नववर्षाचा आनंद नागरिकांना लुटता आला नव्हता. मात्र, यंदा नववर्षाच्या जल्लोषावर कोणतेही निर्बंध नसल्याने 31 डिसेंबर रोजी रात्रीपासूनच पर्यटकांनी पुण्याच्या मध्यवर्ती रस्त्यांवर येण्याचा बेत आखला. तसेच, स्थानिक नागरिकांनीही गर्दी केल्याने रविवारचा दिवस गर्दीचा ठरला.

सर्वांनीच दगडूशेठ, सारसबाग परिसरातील सिद्धीविनायक, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री स्वामी समर्थ केंद्र, श्री खंडोबा शहरातील सर्वच मोठ्या मंदिरांत रांगा लावून दर्शन घेतले. बाहेरच्या राज्यांतून शहरात पर्यटक मोठ्या प्रमाणावर आले आहेत. त्यांनी देखील या सर्व ठिकाणी गर्दी केल्याने पोलिस यंत्रणेवर ताण आला होता. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली होती. राज्याबाहेरून आलेल्या पर्यटकांनी शनिवारवाडा, पर्वती, आगाखान पॅलेस येथेही गर्दी केली होती. शाळांना सुट्टी असल्याने स्थानिक नागरिकांनीही सहकुटुंब या सर्व स्थळांना भेटी देत नववर्ष साजरे केले.

गर्दी अन् तिकीट विक्रीचा उच्चांक…
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात पहिल्यांदाच इतकी गर्दी झाली होती. तिकीट खिडकीवर पर्यटकांच्या रांगा लागल्या होत्या. ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी रविवारी कर्मचार्‍यांसह अधिकारी मैदानात उतरले होते. प्राणिसंग्रहालयात यापूर्वी 29 मे 2022 रोजी सर्वाधिक पर्यटक भेटीचा उच्चांक नोंदविला होता. त्या वेळी 24 हजार 800 पर्यटकांनी भेटी दिल्या होत्या. तेव्हा 8 लाख 55 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. हे पर्यटक भेटीच्या उच्चांकाचे रेकॉर्ड 2023 या नववर्षाच्या पहिल्या दिवशी तुटले अन् 25 हजार 760 पर्यटक भेटीचा नवा रेकॉर्ड नोंदविण्यात आला आहे.

पार्किंग फुल्ल अन् वाहतूक कोंडी..
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या शेजारी पर्यटकांसाठी महापालिकेचे पार्किंग आहे. हे पार्किंग दर वीकेंडला वाहनांच्या गर्दीने हाऊसफुल्ल असते. त्यामुळे अनेकांना रस्त्यालगत, पादचारी मार्गावर गाड्या पार्क कराव्या लागतात. रविवारी प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची तुफान गर्दी झाली होती, त्यामुळे पार्किंगही फुल्ल झाले होते. त्यामुळे भारती विद्यापीठ परिसरापासून प्राणिसंग्रहालयाच्या पुढेपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

Back to top button