पिंपरी : दोन सराईतांकडून 4 पिस्तुले व 4 काडतुसे जप्त

file photo
file photo

चाकण : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा 3 यांनी चाकण औद्योगिक परिसरात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोन सराईत आरोपींकडून चार पिस्तुले व चार जिवंत काडतुसे जप्त केली. ही कारवाई पोलिसांनी बुधवारी (दि. 28) चाकण व महाळुंगे पोलिसांच्या हद्दीत केली. पहिल्या कारवाईत पोलिसांना चाकण पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करताना अरविंद सिकंदर शेख (वय 29, रा. चाकण) हा ग्लाडीयस इंग्लिश मीडियम स्कूलकडे जाणार्‍या रस्त्यावर शस्त्रासह थांबल्याची खबर मिळाली.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तीन पिस्तूल व तीन जिवंत काडतुस असा 1 लाख 33 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला. चाकण पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसर्‍या कारवाईत देवेंद्र सुनिल मिंडे (वय 34, रा.म्हाळुंगे) याला पोलिसांनी म्हाळुंगे गावाच्या कमानीजवळ 28 डिसेंबर रोजी ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी देशी बनावटीचे एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा 51 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला.

शेख याच्यावर चाकण पोलिस ठाण्यात खून, मारामारी, बेकायदा शस्त्र बाळगणे असे तीन गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले. देवेंद्र मिंडेवर चाकण पोलिस ठाण्यात खून, खूनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता विरोधी गटाकडून असणार्‍या धोक्यामुळे त्यांनी ही शस्त्रे स्वतः जवळ बाळगल्याचे कबुल केले. पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news