मंचर : ज्येष्ठ व्यक्तीसह नातवास मारहाण | पुढारी

मंचर : ज्येष्ठ व्यक्तीसह नातवास मारहाण

मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : महाळुंगे पडवळ येथे 75 वर्षीय ज्येष्ठ व्यक्ती व त्याच्या नातवास तिघांनी मारहाण केली. याबाबतची फिर्याद कारभारी बबन आवटे (वय 75, रा. महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव) यांनी दिली. याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कारभारी आवटे हे घरी असताना त्यांचा नातू वैष्णव हा पडवळ मळ्यात गेला होता. मळ्यातून आल्यानंतर त्याने आजोबांना मी मळ्यात गेलो असता संतोष पोपट पडवळ, श्रीहरी यमनाजी पडवळ, चंद्रकांत पडवळ (रा. महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव) यांनी तुझे आजोबा कारभारी यांना शेतात घेऊन ये, असे सांगितले आहे.

त्यानंतर फिर्यादी कारभारी आवटे व त्यांचा नातू वैष्णव शेतात गेले असता कारभारी आवटे यांनी कांद्याचे वाफे, शेतातील पाण्याचे बारे व पाईप का तोडले, असे विचारले असता संतोष पडवळ, चंद्रकांत पडवळ, श्रीहरी पडवळ यांनी कारभारी आवटे व त्यांचा नातू वैष्णव यांना शिवीगाळ करत तुम्ही आम्हाला विचारणारे कोण, असे म्हणत हाताने व बांबूने पाठीवर मारहाण के. तसेच पुन्हा आमच्या नादाला लागले, तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. याबाबत कारभारी आवटे यांनी मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी तिघांवर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मंचर पोलिस करत आहे.

Back to top button