पुणे : चार घरफोड्यांत सात लाखांचा ऐवज चोरीला | पुढारी

पुणे : चार घरफोड्यांत सात लाखांचा ऐवज चोरीला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध भागांतील चार घरफोड्यांत चोरट्यांनी बंद सदनिका फोडून सात लाख 17 हजार रुपयांचा ऐवज चोरला. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्वती परिसरातली तुळशीबागवाले कॉलनीतील वनिता अपार्टमेंट व रत्नदीप सोसायटीतील दोन सदनिकांवर चोरट्यांनी डल्ला मारला. रोकड सोन्याचे दागिने असा 4 लाख 41 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. याबाबत राहुल यादव (वय 43) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 29 ते 30 डिसेंबर या कालावधीत घडली.

फिर्यादी हे त्यांची राहती सदनिका बंद करून बावधन येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी सदनिकेच्या दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूमधील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व इतर ऐवज असा 2 लाख 18 हजार रुपयांचा ऐवज चोरला. तर त्यांच्या सोसायटीच्या समोरील रत्नदीप सोसायटीतील मंदाकिनी तुळशीबागवाले यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड व दागिने असा 2 लाख 28 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. तसेच व्यंकटेश तुळशीबागवाले यांच्या सदनिकेतूनदेखील चोरट्यांनी रोकड, चांदीची भांडी असा 55 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. वनिता अपार्टमेंटमधील राहुल यादव यांच्या सदनिकेत चोरी झाल्याचे समोर आले आहे. मात्र, नेमका किती ऐवज चोरीस गेला हे समजू शकले नाही. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कामठे करीत आहेत.

पौड रोड कोथरूड येथील प्रज्ञा अपार्टमेंटमधील बंद सदनिकेतून चोरट्यांनी दोन लाख रुपये किंमतीचे दागिने चोरी केले.22 ते 30 डिसेंबर या कालावधीत ही चोरी झाली आहे. याबाबत एका 72 वर्षीय महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. केशवनगर मुंढवा येथील एका 63 वर्षीय महिलेच्या सदनिकेतून चोरट्यांनी 16 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरी केला आहे. याबाबत त्यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नोडल अधिकार्‍याच्या नियुक्तीमुळे सदनिकाधारकांना दिलासा

Back to top button