पुणे : आर्थिक फसवणुकीचे आरोप वरूण सरदेसाई यांनी फेटाळले | पुढारी

पुणे : आर्थिक फसवणुकीचे आरोप वरूण सरदेसाई यांनी फेटाळले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हिंदुस्थान स्काऊट अँड गाईड संस्थेच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवानेते वरूण सरदेसाई यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत फेटाळला. भाजपचे नेते बेछूट खोटे आरोप करून विरोधकांना बदनाम करण्याचे नीच राजकारण करीत असल्याचा आरोप सरदेसाई यांनी यावेळी केला.

भाजपचे आमदार योगेश सागर यांनी विधानसभेत हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात आरोप करीत चौकशीची मागणी केली होती. सहा-सात मुलांकडून नोकरी देण्याचे आमिष दाखवीत काही लाख रुपये घेतल्याचे आरोप त्यांनी केले. याप्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून सरदेसाई ओळखले जातात. त्यामुळे ठाकरे यांच्या पाठोपाठ सरदेसाईविरुद्ध चौकशी करण्याचा निर्णय झाल्याने शिवसेनेत खळबळ उडाली.

सरदेसाई त्यांची बाजू मांडताना म्हणाले, हिंदुस्थान स्काऊट अँड गाईड संस्थेच्या प्रदेशाध्यक्षपदी ऑक्टोबर 2021 मध्ये माझी निवड झाली. त्यानंतर संस्थेने नागपूरला केवळ एक शिबिर घेतले. ज्या सात ते आठ मुलांची नावे घेतली, त्यांना मी ओळखतदेखील नाही. मदत व पुनर्वसनविषयी प्रशिक्षण देण्याचे काम ही संस्था करीत असल्याने, त्यांचा नोकरी देण्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराचा प्रश्नच उद्भवत नाही. सरदेसाई म्हणाले, की सहा मंत्र्यांविरुद्ध पुराव्यासह आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे विरोधकांविरुद्ध खोटे आरोप करीत भाजपचे केवळ नीच राजकारण सुरू आहे. विधिमंडळाबाहेर त्यांनी आरोप केल्यास त्यांच्याविरोधात मी न्यायालयात दाद मागेन.

Back to top button