पुण्यासह राज्यातील 70 जणांना कोरेगाव भीमाला जाण्यासाठी बंदी | पुढारी

पुण्यासह राज्यातील 70 जणांना कोरेगाव भीमाला जाण्यासाठी बंदी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यासह राज्यातील 70 जणांना 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच, सोशल मीडियावर पोलिसांचे काटेकोर लक्ष असून, या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍या चौघांना नोटीस पाठविण्यात आल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले.

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो अनुयायी येत असतात. त्यामुळे कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पुणे ग्रामीण, पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आयुक्तालय यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. बाहेरच्या जिल्ह्यातूनदेखील अतिरिक्त फौजफाटा मागविण्यात आला आहे. याबाबत पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तयारीची माहिती फुलारी यांनी दिली. या वेळी पोलिस अधीक्षक अंकीत गोयल उपस्थित होते.

सुनील फुलारी यांनी सांगितले, की कोरेगाव भीमा येथे होणार्‍या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी, तसेच तपासणी करण्यासाठीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या समन्वयातून बंदोबस्ताची आखणी केली आहे. परिसरातील गावांमध्ये शांतता कमिटीच्या बैठका घेण्यात आल्या. या पूर्वी या परिसरात झालेल्या गुन्ह्यांमधील संशयित असलेल्या आरोपींकडून कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी अशा पुणे तसेच राज्यातील विविध ठिकाणच्या 70 जणांना 144 कलमानुसार येथे येण्यास बंदी घातली आहे. त्या-त्या पोलिस घटकांमार्फत नोटिसा देण्यात आल्या आहेत. ते या परिसरात आले, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

समाजमाध्यमांवर पोलिसांचा 24 तास वॉच

शौर्य दिनानिमित्त कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट कोणी पाठविल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे फुलारी यांनी सांगितले. त्यासाठी सायबर पोलिसांकडून 24 तास सोशल मीडियावर नजर ठेवण्यात आली आहे. अशा आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍या चौघांना नोटिसा देण्यात आल्या असून, त्या पोस्ट काढून टाकण्यास सांगितले आहे. पोस्ट टाकणारी व्यक्ती कोणत्या जिल्ह्यातील आहे हे पाहून, त्यासंदर्भात ती माहिती त्या पोलिस अधीक्षक कार्यालयाला देण्यात येत आहे. अभिवादनासाठी येणार्‍या नागरिकांनी वाहनांसाठी आखण्यात आलेल्या नियोजनाचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन फुलारी यांनी केले.

…असा आहे ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त

पुणे ग्रामीण पोलिसांनीदेखील बंदोबस्ताची मोठी आखणी केली आहे. गर्दीचे नियंत्रण, वाहनांची पार्कगिं व्यवस्था, ड्रोनद्वारे संपूर्ण परिसरावर लक्ष, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर असणार आहे. त्यासाठी 7 पोलिस अधीक्षक, 18 विभागीय पोलिस अधिकारी, 60 पोलिस निरीक्षक, 180 सहायक निरीक्षक, राज्य राखीव पोलिस दलाच्या 4 कंपन्या, 1 हजार होमगार्ड असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाई…
पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असलेले लोणावळा आणि पौड परिसरात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पुणे, मुंबईसह इतर ठिकाणाहून पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे परिसरात अनेकदा वाहतूक कोंडी होते. तसेच, मद्यप्राशन करून वाहने चालवली जातात. त्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांकडून नाकाबंदी करून कारवाई करण्यात येत आहे. तसेच, लोणावळा येथे बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यापूर्वी परिसरातील अवैध धंद्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनीदेखील नियमांचे पालन करून नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांनी केले आहे.

Back to top button