राजगुरूनगर-भीमाशंकर महामार्गाचे काम तातडीने सुरू करा; दिलीप मेदगे यांची गडकरींकडे मागणी | पुढारी

राजगुरूनगर-भीमाशंकर महामार्गाचे काम तातडीने सुरू करा; दिलीप मेदगे यांची गडकरींकडे मागणी

वाडा; पुढारी वृत्तसेवा : राजगुरूनगर-भीमाशंकर रस्त्याला नुकताच केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग दर्जा दिला असल्याने त्यावरील पुढील प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी व लवकरात लवकर काम सुरू करावे, अशी मागणी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी पुणे दौर्‍यावर असलेले केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना केली. खेड तालुक्यातील पश्चिमभागाचा यामुळे विकास होईल व आदिवासी तरुणांना रोजगार निर्माण होईल. चासकमान धरणाच्या पाणीसाठ्याच्या बाजूने जाणारा हा महामार्ग रोजगाराचा, पर्यटनाचा महामार्ग ठरू शकेल.

या रस्त्यावर जमीन अधिग्रहण केली जाणार नाही, त्यामुळे तातडीने डीपीआरला मान्यता देऊन याचे काम पूर्ण करण्यात यावे. राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता संतोष शेलार व कार्यकारी अभियंता देशपांडे यांच्याशी वारंवार चर्चा करून माहिती घेऊन वेळोवेळी सूचना करण्यात येत असल्याचे दिलीप मेदगे यांनी सांगितले.

या रस्त्याचे 10 मीटर रुंदीचे संपूर्ण काँक्रिटीकरण होणार असून, भविष्यात 25 वर्षे खड्डे मुक्त व पक्का रस्ता तयार झाल्यास पर्यटन, शेती, व्यवसाय, रोजगार यासाठी प्रचंड संधी यामुळे उपलब्ध होणार आहेत. या संपूर्ण रस्त्यावरील पुलांची रुंदी वाढवण्यात येणार असून, आवश्यक ठिकाणी नवीन छोटे-मोठे पूल बांधण्यात येत आहेत.

आदिवासी भागातील रानमेवा, जांभूळ,करवंदे, हिरडा, सेंद्रिय भातशेती, नाचणी यांना मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होईल. पर्यटक वाढल्याने ग्रामीण भागातील रोजगाराला प्रचंड मोठी चालना मिळेल. खेड तालुक्यातील पश्चिम भागाच्या विकासाला हा महामार्ग वरदान ठरणार असल्यामुळे याची कामे तातडीने सुरू करावी, अशी आग्रही मागणी दिलीप मेदगे यांनी भेटीदरम्यान केली.

Back to top button