रामोशी वतनी जमिनी लुबाडणार्‍यांवर कारवाई करू : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा | पुढारी

रामोशी वतनी जमिनी लुबाडणार्‍यांवर कारवाई करू : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा

निमोणे; पुढारी वृत्तसेवा : रामोशी समाजाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन अनेक ठिकाणी गावगुंडांनी व काही ठिकाणी सरकारनेच चुकीच्या पध्दतीने रामोशी वतनावर कब्जा केला आहे. पुढील काही दिवसांत मंत्रालयात रामोशी वतनी जमिनीसाठी बैठक घेऊन धनदांडग्याच्या तावडीतून रामोशी वतन काढून घेऊ, अशी ग्वाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक दौलतनाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नागपूर येथे विखे पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.

या वेळी दौलत शितोळे यांनी रामोशी समाजावर गावोगावच्या गावगुंडांकडून होणार्‍या अन्यायाचा पाढा वाचला. रामोशी समाज हा मूळचा कर्नाटकचा, त्या ठिकाणी या समाजाला बेरड म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र – कर्नाटक सरहद्दीवर बेरड व महाराष्ट्र रामोशी या नावाने या समाजाची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या समाजाने अतिशय प्रामाणिकपणे स्वराज्याची सेवा केली. दिलेल्या शब्दाला जागणारी जात म्हणून हा समाज ओळखला जातो.

एकट्या पुणे जिल्ह्यात रामोशी वतनाची तब्बल एकवीस हजार एकर जमीन असल्याचे शासकीय अभिलेखातून पाहायला मिळते. मात्र, स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून गावगाड्यातील धनदांडग्यांनी या जमिनी अक्षरशः लुबाडल्या आहेत. जन्मजात गुन्हेगारी जमात म्हणून कायम कायद्याचा धाक दाखवून तत्कालीन गावगुंडांनी या समाजाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन जमिनीवर नाव चढवले. काही ठिकाणी वेळेवर शेतसारा भरला नाही म्हणून सरकारनेच जमिनी ताब्यात घेतल्या. बहिर्जी नाईक, आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचा वारसा सांगणार्‍या रामोशी समाजावर घोर अन्याय करणार्‍या गावगुंडांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी दौलत शितोळे यांनी केली आहे.

दरम्यान, विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदर तालुक्यातील भिवंडी येथील उमाजी नाईक यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाच्या पूर्तीसाठी समाजाच्या वतीने त्यांची भेट घेऊन त्यांना स्मरणपत्र देण्यात आले.

Back to top button