

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वैयक्तिक घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना आत्तापर्यंत एकूण 25 कोटी 46 लाख रुपये इतके अनुदान वितरित करण्यात आले आहे. पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता असे टप्पानिहाय अनुदान वाटप केले जात आहे.
प्रधानमंत्री आवास योजना घटक क्रमांक 4 वैयक्तिक स्वरुपातील घरकुल स्वमालकीच्या जागेवर बांधण्यास अनुदान (बीएलसी) दिले जाते. पीएमआरडीएकडून पहिल्या टप्प्यात 13 हजार 841 लाभार्थ्यांच्या प्रकल्प अहवालाला केंद्र व राज्य सरकारची मंजुरी मिळालेली आहे. तर, दुसर्या टप्प्यात 5 हजार 271 लाभार्थ्यांच्या प्रकल्प अहवालास 31 मार्च 2022 रोजी मंजुरी मिळाली आहे.
पीएमआरडीएकडून आत्तापर्यंत 10 हजार 860 लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. त्यापैकी 1 हजार 836 लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम सुरू केले आहे. 1 हजार 552 लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे प्रत्येकी एक लाख इतके अनुदान वितरित करण्यात आले आहे. तर, 994 लाभार्थ्यांना दुसर्या हप्त्याचे प्रत्येकी एक लाखाप्रमाणे अनुदान वितरित केले आहे. तिसर्या व शेवटच्या हप्त्याचे 82 लाभार्थ्यांचे अनुदान प्रत्येकी 50 हजार रुपयांप्रमाणे वितरित करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लवकरच ती लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये
जमा होणार आहे. पीएमआरडीएकडून लाभार्थी अनुदानापोटी एकूण 25 कोटी 46 लाख इतकी रक्कम आजअखेर वितरित केली आहे.
केंद्र सरकारने 2022 पासून नवीन डीपीआर मंजुरीस पाठविण्यास मनाई केली आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल यांनी दिली.