सोमेश्वर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी प्रणिता खोमणे; प्रथमच महिलेला मिळाली संधी | पुढारी

सोमेश्वर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी प्रणिता खोमणे; प्रथमच महिलेला मिळाली संधी

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी प्रणिता मनोज खोमणे यांची शुक्रवारी (दि. 30) बिनविरोध निवड करण्यात आली. कारखान्याच्या कार्यालयात संचालक मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत खोमणे यांची या पदावर निवड करण्यात आली. सोमेश्वरच्या इतिहासात प्रथमच महिला संचालकाला उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी या पदासाठी प्रणिता खोमणे यांचे नाव जाहीर केले.

निवडीनंतर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व संचालक मंडळाच्या हस्ते खोमणे यांचा सत्कार करण्यात आला. प्रणिता खोमणे यांचे पती डॉ. मनोज खोमणे हे बारामती तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. यापूर्वीचे उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांनी ठरलेल्या कालावधीत उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. या पदासाठी अनेक संचालक इच्छुक होते. मात्र, अजित पवार यांनी कोर्‍हाळे खुर्दच्या माजी सरपंच असलेल्या प्रणिता खोमणे यांना या पदावर काम करण्याची संधी देत महिलाही सहकार कारखानदारीत काम करण्यास तयार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

कारखान्याच्या निवडणुकीनंतर वर्षाला एक याप्रमाणे पाच वर्षांत पाच संचालकांना उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. धनगर समाजाला प्रतिनिधित्व देऊन पवार यांनी राजकीय समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे यांनी काम पाहिले. या वेळी सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, संचालक संग्राम सोरटे, सुनील भगत, अजय कदम, अभिजीत काकडे, तुषार माहुरकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, सर्व संचालक व अधिकारी उपस्थित होते. संचालक ऋषीकेश गायकवाड यांनी आभार मानले.

दै. ‘पुढारी’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब
सोमेश्वर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी महिला संचालकांना संधी मिळण्याची शक्यता असल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’ने नुकतेच प्रसिध्द केले होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धक्कातंत्राचा वापर करत प्रणिता खोमणे यांना संधी दिल्याने दै. ‘पुढारी’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले.

पुरंदर तालुक्याला डावलले
सोमेश्वर कारखान्याचे कार्यक्षेत्र पुरंदर तालुक्यातही आहे. त्यामुळे उपाध्यक्षपदासाठी पुरंदर तालुक्यातील बहुतांश संचालक इच्छुक होते. मात्र, पुरंदर तालुक्यातील संचालकांना पुन्हा डावलण्यात आले असून, त्यांना पुढे संधी मिळण्याची आशा आहे.

Back to top button