आज संध्याकाळी ७ पासून पुण्यातील 2 मुख्य रस्ते बंद; ‘या’ परिसरात वाहतुकीत बदल | पुढारी

आज संध्याकाळी ७ पासून पुण्यातील 2 मुख्य रस्ते बंद; 'या' परिसरात वाहतुकीत बदल

पुणे, पुढारी ऑनलाईन : पुण्यात गेले दोन वर्ष कोरोनामुळे नवीन वर्ष साजरे करण्यात आले नव्हते. मात्र या वर्षी नवीन वर्ष जल्लोषात साजरे करण्याचे नियोजन पुण्यासह सर्वच भागात केले आहे. यंदा निर्बंधमुक्त वातावरणात नवीन वर्षाचे स्वागत केले जाणार आहे. तरुणाई नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात फर्ग्युसन रस्ता, कॅम्प परिसरासह अनेक रत्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. तसेच आज संध्याकाळी ७ ते उद्या १ जानेवारी पहाटे ५ वाजेपर्यंत फर्ग्युसन रस्ता आणि महात्मा गांधी रस्ता हे दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

वाहतूकीतील बदल पुढीलप्रमाणे :

  • वाय जंक्शनवरून एम. जी. रोडकडे जाणारी वाहतूकही 15 ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मस्जिद व सुजात मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.
  • इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूकही बंद करण्यात येणार आहे.
  • व्होल्गा चौकाकडून महमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून, ही वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येणार आहे.
  • इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून, ही वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलिस ठाण्याकडे वळविण्यात येणार आहे.
  • सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून, सदरची वाहतूक ताबूत स्ट्रीटमार्गे पुढे मार्गस्थ होईल.
  • फर्ग्युसन रोड, गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेटपर्यंत एम. जी. रोड ते 15 ऑगस्ट चौक ते हॉटेल अरोरा टॉवर येथे नो-व्हेईकल झोन करण्यात आला आहे. 31 डिसेंबरच्या रात्री सात वाजल्यापासून 1 जानेवारीच्या पहाटे पाच वाजेपर्यंत नो-व्हेईकल झोन करण्यात आला आहे.

Back to top button