येरवडा; पुढारी वृत्तसेवा : बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अॅड. संदीप ताजणे यांच्यावर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या हस्तकांमार्फत गुन्हा दाखल करण्यात आला. बसपाच्या वतीने नागपूर येथील विधानभवनावर गेल्या 23 डिसेंबर रोजी काढण्यात येणार्या आक्रोश मोर्चाला अडकाठी निर्माण करण्यासाठी बसपा विरोधकांनी जाणीवपूर्वक पक्षाच्या कार्यालयात घुसून प्रदेशाध्यक्षांवर हल्ला केल्याचा आरोप पुणे जिल्हा, शहर बसपाच्या वतीने पक्षाचे प्रदेश प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांनी केला आहे. या घटनेचा निषेध करून अॅड. ताजणे यांच्यावरील गुन्हा रद्द करावा व बसपा नेत्यांना पोलिस संरक्षण
मिळावे, अशी मागणी पुणे जिल्हाधिकार्यांकडे पक्षाच्या वतीने निवेदनद्वारे केली आहे. बसपाचे प्रदेश प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी, प्रदेश महासचिव सुदीप गायकवाड, प्रदेश सचिव शीतल गायकवाड, जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष महंमद शफी, जिल्हा महिला अध्यक्ष निधी वैद्य, युवक आघाडी अध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, शहर महिला अध्यक्ष सुरेखा कांबळे, राजेश इंद्रेकर, अरुण गायकवाड, तन्वीर सय्यद, राजेश बेंगळे, सागर खंडे, रमेश घोडके, अजय सरोदे, राजेंद्र राऊत, योगेश आल्हाट, आदित्य कांबळे, बाबासाहेब ससाणे, माया जाधव, शिल्पा माने, प्रिती गायकवाड आदी उपस्थित होते.