

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्याने रिक्षा कात्रज घाटात गेल्यानंतर रिक्षाचालक महिलेसोबत किळसवाणे कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या वेळी त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला. महिलेने पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्या महिलेचा आरोपीने पाठलाग केल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. 26 डिसेंबरच्या रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी निखिल अशोक मेमजादे (वय 30, रा. शंकर मठ, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात 38 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.
तक्रारदार रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. दरम्यान, रात्री त्या रिक्षा चालवत असताना मगरपट्टा येथून आरोपी त्यांच्या रिक्षात प्रवासी म्हणून बसला. त्याने कात्रज घाटात जायचे असल्याचे सांगितले. रिक्षा कात्रज घाटात रात्री दहाच्या सुमारास आल्यानंतर अंधार पाहून त्याने एका लॉजिंगच्या बोर्डजवळ रिक्षा थांबविण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी निखिलने महिलेला जेवणासाठी बळजबरी केली. त्यांनी नकार दिल्यानंतर आरोपीने महिलेला चापट मारून शारीरिक संबंधाची मागणी केली. त्यानं या सर्व प्रकाराने घाबरलेली महिला पळत असताना तिचा पाठलाग केला.