पुणे : वैद्यकीय महाविद्यालयासाठी 108 कोटींची तरतूद | पुढारी

पुणे : वैद्यकीय महाविद्यालयासाठी 108 कोटींची तरतूद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या भारतरत्न डॉ. अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी पुढील आर्थिक वर्षासाठी 108 कोटी रुपयांची तरतूद करण्यासह विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व कर्मचार्‍यांसाठी निवासी इमारत बांधण्यासाठी 88 कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या संचालक मंडळाची महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक झाली. या वेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे व विकास ढाकणे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.

महापालिकेतर्फे मागील वर्षी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यासाठीचे पहिल्या वर्षाचे वर्ग मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयाजवळ असलेल्या सणस शाळेत सुरू आहेत. महाविद्यालयासाठी शैक्षणिक, प्रशासकीय व अन्य खर्च लक्षात घेता 2023-24 या आर्थिक वर्षासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात 108 कोटी रुपयांची तरतूद करण्यास संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता महाविद्यालयाच्या परिसरात वसतिगृह उभारणे आणि कर्मचार्‍यांसाठी निवासी इमारत उभारण्यासाठी 88 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली.

Back to top button