पारगाव : कांदा सडल्यामुळे भावात घट; उत्पादक अडचणीत | पुढारी

पारगाव : कांदा सडल्यामुळे भावात घट; उत्पादक अडचणीत

पारगाव (ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा :  तालुक्याच्या पूर्वभागात बराकीत साठविलेला कांदा सडून गेल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. सडलेल्या कांद्यांना बाजारभावदेखील कमी मिळत आहे. अनेक शेतकर्‍यांच्या बराकींसमोर सडलेल्या कांद्यांचा ढीग सध्या पाहायला मिळत आहे.

तालुक्याच्या पूर्वभागात उन्हाळी कांदापीक मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेतात. कांदा काढल्यानंतर शेतकरी तो कांदा चांगला बाजारभाव मिळेपर्यंत बराकीत साठवतात. यंदा चांगल्या बाजारभावाची साथ शेतकर्‍यांना मिळालीच नाही. नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्यावेळी उच्चांकी बाजारभाव मिळाला होता. दहा किलोला तीनशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला होता.

बाजारभावात आणखी वाढ होईल, या आशेने शेतकर्‍यांनी कांदा तसाच साठवून ठेवला. परंतु, साठवलेला कांदा दूषित हवामानामुळे सडून गेला. कांदा सडण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकर्‍यांनी आता मिळेल त्या बाजारभावात कांदा विक्री सुरू केली आहे. दहा किलोला 210 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. परंतु, प्रतवारी करताना खराब कांदेच निघत आहेत. त्यांना बाजारभाव कमी मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

Back to top button