वेल्हे : भीषण आगीत हजारोंचा चारा खाक; प्रसंगावधानाने जीवितहानी टळली | पुढारी

वेल्हे : भीषण आगीत हजारोंचा चारा खाक; प्रसंगावधानाने जीवितहानी टळली

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला वेल्हे व हवेली तालुक्याच्या हद्दीवरील कोंडगाव व खामगाव मावळ येथे गुरुवारी (दि. 29) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उच्च दाबाच्या वीजतारांचे घर्षण होऊन लागलेल्या भीषण आगीत जनावरांचा चारा जळून खाक झाला. खामगाव मावळ (ता. वेल्हे) येथील सविता मुरलीधर भोसले या गवत कापत असताना विजेच्या तारांचे घर्षण होऊन ठिणग्या पडल्या. जोरदार वारे वाहत असल्याने वाळलेल्या गवताने पेट घेऊन आगीचा भडका उडाला. त्या वेळी शेजारी भाताची मळणी करणारे मावळा संघटनेचे प्रशांत भोसले, खामगाव तंटामुक्त समितीचे हर्षद भोसले आदी शेतकर्‍यांनी जोरदार आरडाओरडा केल्याने सविता

भोसले गवत कापणी सोडून धावत खानापूर-वेल्हे रस्त्यावर आल्याने सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. याबाबत शेतकर्‍यांनी खानापूर येथील महावीज वितरण विभागाला माहिती दिली असून सायंकाळी उशिरापर्यंत घटनास्थळी कोणीही आले नसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. जवळपास 100 एकर क्षेत्रातील वाळलेले उभे गवत व शेतकर्‍यांनी जनावरांच्या चार्‍यासाठी कापून ठेवलेल्या गवताच्या पेंढ्या आगीत भस्मसात झाल्या.

आगीने रौद्ररूप धारण केले होते. आग नियंत्रणात आणण्यासाठी शेतकर्‍यांनी अटोकाट प्रयत्न केले, मात्र जोरदार वार्‍यामुळे चोहोबाजूंना आग पसरली. तासाभरात जवळपास शंभर एकर क्षेत्रातील वाळलेले गवत चारा जळून खाक झाले. अनिल साहेबराव भोसले, किसन केरबा, विलास भोसले, दशरथ भोसले, संजय भोसले आदी शेतकर्‍यांचे गवत जळून जवळपास एक ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

नुकसानभरपाईची मागणी
आगीत जनावरांचा चारा नष्ट झाल्याने जनावरे जगवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वीज कंपनीने शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती किसनराव जोरी यांनी केली आहे.

 

Back to top button