पिंपरी : कचरा नियमित उचलण्यात महापालिका प्रशासनाकडून चालढकल | पुढारी

पिंपरी : कचरा नियमित उचलण्यात महापालिका प्रशासनाकडून चालढकल

मिलिंद कांबळे :

पिंपरी : शहरातील विविध सोसायट्यांमध्ये कचरा नियमित उचलण्यात महापालिका प्रशासनाकडून चालढकल होत असल्याच्या तक्रारी सोसायट्यांकडून करण्यात येत आहे. वाकड, रहाटणी, काळेवाडी येथील सोसायट्यांमध्ये प्रामुख्याने ही अडचण येत आहे. सोसायट्यांकडून ओला व सुका कचरा विलगीकरण करून देणे अपेक्षित असताना काही सोसायट्या मिश्र स्वरुपातील कचरा देत असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. शहरातील काही सोसायट्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नियमित कचरा उचलला जात नाही. त्यामुळे सोसायट्यांतील रहिवाशी हैराण झाले आहेत.

पर्यायाने, सोसायट्यांमध्ये कचरा साठत असून या कचर्‍याचे करायचे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाकडून नियमित कचरा उचलला जात नसल्याने त्यावर तोडगा म्हणून काही सोसायट्यांनी हा कचरा प्रक्रिया करण्यासाठी खासगी एजन्सीला दिला आहे. खासगी एजन्सीकडून या कचर्‍यावर प्रक्रिया करून त्याची खतनिर्मिती केली जात आहे. निर्माण केलेले खत सोसायटयांतील उद्यानांसाठी देण्यात येत आहे.

..त्या सोसायट्यांबाबत ठरविणार धोरण

दररोज 100 किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणार्‍या सोसायट्यांतील कचर्‍याचे सोसायटी स्तरावरच निर्मूलन व्हावे, यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या माध्यमातून शिफारशी केल्या जाणार आहेत. समितीकडून आयुक्तांना याबाबत अहवाल सादर करण्यात आल्यानंतर त्याविषयी धोरण ठरविले जाणार आहे, अशी माहिती अजय चारठाणकर यांनी दिली.

पालकमंत्र्यांकडून स्थगिती तरीही…

महापालिका प्रशासनाने यापूर्वी 100 किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणार्‍या सोसायट्यांना कचरा निर्मूलनासाठी कंपोस्टिंग प्लॉन्ट उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच, 1 नोव्हेंबरपासून संबंधित सोसायट्यांतील ओला कचरा न उचलण्याची भूमिका घेतली होती. या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशा सुचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आयुक्तांना दिल्या होत्या. त्यानंतर सोसायट्यांतील कचरा उचलला जात आहे. मात्र, हा कचरा नियमित उचलला जात नसल्याच्या सोसायट्यांच्या
तक्रारी आहेत.

 

सोसायट्यांनी अलगीकरण करून कचरा द्यावा
काही सोसायट्या या ओला व सुक्या कचर्‍याचे अलगीकरण करून देत नव्हते. त्यांना त्याबाबत महापालिका प्रशासनाकडून सूचना करण्यात आल्या आहे. त्यांनी त्यामध्ये सुधारणा केल्यानंतर त्यांचा कचरा उचलण्याची कार्यवाही केली जात आहे, अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी दिली. चारठाणकर म्हणाले, वाकड भागामध्ये कचरा वाहतूक करणार्‍या वाहनांची समस्या निर्माण झाल्याने काही सोसायट्यांचा कचरा उचलण्यात अडचणी आल्या. महापालिका प्रशासनाकडून बहुतांश भागात सुका कचरा दररोज उचलला जात आहे. तर, काही ठिकाणी हा कचरा दिवसाआड उचलण्यात येत आहे.

काळेवाडी येथे काही सोसायट्यांतील कचरा न उचलण्याची भूमिका गेल्या आठवड्यात महापालिका प्रशासनाने घेतली होती. सध्या त्यावर तोडगा काढण्यात आला आहे. मात्र, अशी भूमिका का घेतली जात आहे, याचे कोडे उलगडत नाही. शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणार्‍या सोसायट्यांतील ओला कचरा न उचलण्याच्या निर्णयाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थगिती दिलेली आहे.
– दत्तात्रय देशमुख, अध्यक्ष,पिंपरी-चिंचवड गृहनिर्माण सहकारी संस्था फेडरेशन

महापालिकेकडून सध्या नियमित कचरा उचलला जात नसल्याने आम्ही खासगी एजन्सीला प्रक्रिया करण्यासाठी कचरा देत आहोत. ते कचर्‍यावर प्रक्रिया करून निर्माण झालेले खत सोसायटीला देतात. हे खत आम्ही सोसायटीतील उद्यानात वापरत आहोत. मात्र, यामुळे आमच्या खर्चात वाढ झाली आहे.

– प्रशांत पाटील, उपाध्यक्ष, संस्कृती सोसायटी (फेज-3), वाकड.

महापालिकेकडून सध्या सोसायट्यांमध्ये दिवसाआड तर कधी-कधी दोन ते तीन दिवसांनी कचरा उचलला जात आहे. आमच्या सोसायटीत असलेल्या कम्पोस्टिंग प्लॉन्टमध्ये आम्ही ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करत आहोत. मात्र, सुका कचरा महापालिकेकडून नियमित उचलला जाणे गरजेचे आहे.
-पराग तांबे, सफायर पार्क सोसायटी, वाकड

Back to top button