पुणे : पीएच.डी. मुलाखतींसाठी 30 जानेवारीची डेडलाइन | पुढारी

पुणे : पीएच.डी. मुलाखतींसाठी 30 जानेवारीची डेडलाइन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न पीएच.डी. प्रवेश देणार्‍या सर्व संशोधन केंद्रांची शैक्षणिक आणि प्रशासकीय तपासणी विद्यापीठाकडून पूर्ण करण्यात आली आहे. तसेच पात्र संशोधन केंद्रांना संशोधक विद्यार्थ्यांच्या मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 जानेवारीची अंतिम मुदत देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाच्या सहायक कुलसचिवांनी दिलेल्या निर्देशानुसार, सर्व मान्यताप्राप्त संशोधन केंद्रांना कळविण्यात येते की, संशोधन संस्थांच्या शैक्षणिक व प्रशासकीय तपासणी करण्यात आली असून त्यात आढळलेल्या त्रुटींची पुढील 30 दिवसात पूर्तता करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

ज्या मान्यतापात्र संस्थांनी त्रुटींच्या पूर्तता केलेल्या असून तसा अहवाल विद्यापीठात जमा केलेला आहे, अशा संशोधन संस्थांना पीएच.डी. प्रवेश मुलाखत प्रक्रियेसाठी विभागीय संशोधन समिती देण्याची कार्यवाही सुरू आहे. सर्व संलग्नित संशोधन केंद्र यांना विभागीय संशोधन समिती विद्यापीठाकडून मिळाल्यानंतर सर्व संशोधन केंद्रांनी दि. 30 जानेवारी 2023 पर्यंत पीएच.डी. प्रवेश मुलाखत प्रक्रिया पूर्ण करून त्याचा अहवाल आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह शैक्षणिक प्रवेश विभागात जमा करावेत, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून त्यांची मुलाखतीची प्रक्रिया वेळेत पूर्ण होणार असल्याचे दिसून येत आहे.

Back to top button