तरंगवाडीच्या माळरानावर फुलल्या द्राक्षबागा; गोड द्राक्षांची ग्राहकांना भुरळ | पुढारी

तरंगवाडीच्या माळरानावर फुलल्या द्राक्षबागा; गोड द्राक्षांची ग्राहकांना भुरळ

जावेद मुलाणी

इंदापूर : एकेकाळी इंदापूर तालुक्यातील दुष्काळी कोरडवाहू शेती म्हणून ओळखल्या जाणार्‍या तरंगवाडीच्या उजाड माळरानावर युवा शेतकर्‍यांनी अपार कष्टाच्या जोरावर द्राक्षबागा फुलवल्या आहेत. आता ही द्राक्ष परदेशात निर्यात होऊ लागली आहेत. या परिसराला चालू वर्षीचा हंगाम द्राक्ष शेतीला नवी दिशा देण्याचा ठरत असल्याचे जाणवत आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून अगाप फळछाटणी झालेल्या द्राक्षांचा तोडणी हंगाम सुरू झाला आहे. निसर्गाची साथ, शास्त्रीय ज्ञानाचा पुरेपूर वापर व तरुण द्राक्ष बागायतदारांची अपार मेहनत यांच्या जोरावर इंदापूर तालुक्यातील विशेषत: तरंगवाडी भागातील बागायतदार द्राक्ष काढणीच्या कामांमध्ये मग्न असल्याचे दिसत आहे.

याबाबत महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र वाघमोडे म्हणाले, चालू हंगामामध्ये द्राक्ष बागायतदारांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे. तरंगवाडी भागातील हलक्या पोताच्या जमिनी असणार्‍या शेतकर्‍यांनी ऑगस्टपासूनच फळछाटणीला सुरुवात केली होती व भारी मगदुराच्या जमीनमालकांनी सप्टेंबरपासून फळछाटणीला सुरुवात केली.

फळछाटणीच्या तारखा विभागल्या गेल्यामुळे बाजारामध्ये मालाची आवक माफकच राहत आहे. तसेच, अनुकूल वातावरणामुळे अप्रतिम चवीची द्राक्ष तयार होत आहेत. परिणामी, द्राक्ष मालाला उठाव होऊन समाधानकारक किंमत मिळत आहे. आतापर्यंत देशांतर्गत तसेच बांगलादेशला व्यापारी द्राक्ष पाठवीत असत. परंतु, चालू आठवड्यापासून दुबई, थायलंड या देशांनाही द्राक्ष पाठवण्याची तयारी निर्यातदार करीत आहेत.

डिसेंबर ते एप्रिल चालणार हंगाम
निसर्गाची साथ, अपार मेहनत व कमीत कमी कीटकनाशक, बुरशीनाशकांच्या वापरामुळे उत्कृष्ट चवीची उर्वरित अंशविरहित द्राक्षे तयार झाली आहेत. फळछाटणीच्या तारखा विभागल्या गेल्यामुळे इंदापूर तालुक्यातील द्राक्ष हंगाम डिसेंबर ते एप्रिल असा चालणार असून, उत्तम प्रतीची रंगीत द्राक्ष देशात व परदेशातही ग्राहकांना मिळणार आहेत.

इंदापूर तालुक्यातील टपोरी, गोड, रसाळ द्राक्ष देशांतर्गत तसेच परदेशातही ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. चालू वर्षी द्राक्षांना समाधानकारक बाजारभाव (प्रति किलो 100 ते 141 रुपये) मिळत आहे.

                                                         संपत बुट्टे, द्राक्ष बागायतदार

 

Back to top button